न्यायालय परिसरात विद्यार्थी व पत्रकारांना धक्काबुक्की ; अमित शहांच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्यावरील देशद्रोहाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असलेल्या दिल्लीतील न्यायालयाबाहेर वकिलांनी विद्यार्थी व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींपैकी काही जणांना धक्काबुक्की केली. दरम्यान, कुमारला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारच्या अटकेविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.
येथील पटियाला हाऊस न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वी, वकिलांचा पोशाख घातलेले काही लोक आत शिरले आणि त्यांनी जेएनयूचे विद्यार्थी व शिक्षक यांना, तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कथितरीत्या तेथून बाहेर काढण्यास सुरुवात केली. ‘‘तुम्ही (जेएनयू) राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी तयार करता. तुम्ही देशाबाहेर निघून जायला हवे,’’ असे सांगत आणि ‘भारतमाता की जय, जेएनयू बंद करा’ अशा घोषणा देत ते विद्यार्थी व शिक्षकांना ढकलत होते. आम्ही न्यायालयात असताना, वकिलांचा पोशाख घातलेल्या काही लोकांनी आम्हाला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांनी एकाएकी आम्हाला धक्काबुक्की सुरू केली. त्यांनी आम्हाला ढकलले व मारहाण केली, असे एआयएसएफचे अध्यक्ष वलिउल्ला कादरी यांनी पत्रकारांना सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या एका बदनामीच्या खटल्यासंदर्भात न्यायालयात आलेल्या भाजपच्या एका आमदारानेही भाकपच्या एका कार्यकर्त्यांला कथितरीत्या धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कन्हय्या कुमार याची सुटका केली जाईपर्यंत जेएनयूतील विद्यार्थी सोमवारपासून संपावर गेले. विद्यापीठातील शिक्षकांनी रविवारी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला असला, तरी ते संपात सहभागी झालेले नाहीत. तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या कन्हय्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून संप किंवा निदर्शने यांसारखे मार्ग चोखाळू नयेत, असे आवाहन कुलगुरू जदेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा