नेपाळच्या काठमांडूमध्ये ‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ ही स्पर्धा पार पडली. यावेळी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या समावेशकतेबाबत उत्सव साजरा करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सहभागींनी मुख्य प्रवाहातील राजकारण आणि सामाजिक विकासामध्ये एलजीबीटीक्यू (LGBTQIA) समुदायाच्या समावेशकतेसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ या स्पर्धेचा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला.
आता लंडनमधील मिस्टर गे वर्ल्ड २०२४’ स्पर्धेत नेपाळचे प्रतिनिधित्व लक्ष्मण मगर करणार आहे. एलजीबीटीक्यू या समुदायाच्या नागरी हक्कांबद्दल बोलण्यासाठी तसेच एलजीबीटीक्यू समुदायाच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. आता ‘मिस्टर गे नेपाळ’चा विजेता हा ‘मिस्टर गे वर्ल्ड कॉन्टेस्ट २०२४’ मध्ये भाग घेण्यासाठी लंडनला गे स्पर्धेमध्ये भाग घेईल.
हेही वाचा : इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अहरॉन हलिवांचा राजीनामा, हमास हल्ल्यासह ‘या’ कारणांमुळे सोडलं पद
या स्पर्धेत पहिल्या दहा आणि पहिल्या पाचमधून अंतिम स्पर्धक निवडले जातात. लक्ष्मण मगर यांनी ‘पब्लिक चॉइस अवॉर्ड’हा पुरस्कारही जिंकला आहे. यावेळी ‘आयडेंटिटी ऑफ लव्ह नेपाळ’चे अध्यक्ष गुरुंग यांनी सांगितले की, समलैंगिकांचे हक्क आणि ओळख याचे प्रतिनिधित्व आणि समर्थन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
आपण अलीकडच्या काळात एलजीबीटीक्यू हा शब्द अनेकदा ऐकतो. एलजीबीटीक्यू या समुदायासाठी आता हळूहळू जागरूकता यायला लागली आहे. एलजीबीटीक्यू यांच्यासाठी काही ठिकाणी कायदेदेखील आहेत. नेपाळ हा समलिंगी विवाहाला अधिकृत मान्यता देणारा दक्षिण आशियातील पहिला देश मानला जातो. नेपाळमध्ये लैंगिक अभिमुखतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. खरे तर नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वात एलजीबीटीक्यू अनुकूल देशांपैकी एक मानला जातो.