वृत्तसंस्था, नवी दिल्ली : Karnataka assembly elections 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व भाजपमधून नुकतेच काँग्रेसप्रवेश केलेल्या लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. अथनी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोलार मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. सिद्धरामैया यांना यापूर्वीच वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी राज्यपाल मार्गरेट अल्वा यांचे पुत्र निवेदित यांना कुमटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत २०९ उमेदवार जाहीर केले आहेत.
शेट्टर समर्थक आक्रमक
हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात मला उमेदवारी नाकारल्यास भाजपला राज्यात २० ते २५ जागांचा फटका बसू शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे. शनिवारी शेट्टर यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. या मतदारसंघासाठी भाजपने अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर शेट्टर नाराज आहेत. शेट्टर यांच्या समर्थनार्थ हुबळी-धारवाड महापालिकेच्या भाजपच्या १६ नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे. रविवापर्यंत पक्षाच्या निर्णयाची वाट पाहू, मग पुढील निर्णय घेऊ, असा इशारा शेट्टर यांनी दिला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी शिग्गावमधून अर्ज दाखल केला.
हिजाब, हलाल हे मुद्दे नाहीत – येडियुरप्पा
हिंदू, मुस्लीम यांनी बंधुभावाने राहावे, हिजाब, हलाल हे मुद्दे अनावश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले. अशा मुद्दय़ांना माझा पाठिंबा नाही, असे त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये या मुद्दय़ांवरून वाद झाला होता. मात्र येडियुरप्पांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षातील बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसेच कल्याणकारी योजना यामुळे कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी आज कोलारमध्ये
बंगळूरु : काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी कोलार येथे काँग्रेसच्या सभेमध्ये भाषण करणार आहेत. कोलारमध्येच २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ‘मोदी’ आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.