पीटीआय, नवी दिल्ली
हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले ‘एलसीए तेजस’ हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले. कंपनीच्या बंगळूरु येथील मुख्यालयाने सांगितले की, या दोन आसनी विमानात हवाई दलाच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्याची सर्व क्षमता आहे. आवश्यकतेनुसार ते लढाऊ विमानाची भूमिकाही बजावू शकते.
‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एलसीए) तेजस हे विमान वजनाने हलके आहे. बहुउपयुक्त असलेले हे विमान ४.५ श्रेणीतील असून कोणत्याही हवामानात ते प्रभावी ठरू शकते. अद्ययावत संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण म्हणजे हे विमान असल्याचे हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सांगण्यात आले. या विमानामुळे भारत उच्च क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला असून भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला बळ मिळाले आहे, असे या कंपनीकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>VIDEO: “नरेंद्र मोदी देशातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान”, संजय सिंह यांच्या अटकेनंतर केजरीवालांचा हल्लाबोल
‘एलसीए तेजस’ हवाई दलाकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री अजय भट, हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी. बी. आनंदकृष्णन आदी उपस्थित होते.