रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेला ‘वॅग्नर’ हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे. वॅग्नर ग्रुपनं रशियात बंड केलं असून नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणाच वॅग्नर ग्रुपचा प्रमुख झिबिग्नी प्रिगोझिव्ह यांनी केली आहे. वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळे पुतिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रशियात तणाव वाढत असताना रशियातील विरोधी पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून व्लादिमीर पुतिन यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला आहे.
रशियातील विरोधीपक्ष ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ रशिया’ (LDPR) च्या ट्विटर हँडलवर पुतिन यांचा “स्तन” असलेला एक मॉर्फ केलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच संबंधित पोस्टमध्ये पुतिन यांनी “स्त्री” असं संबोधित केलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधी पक्षाचं ट्विटर खातं हॅक झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
एलडीपीआरचे अध्यक्ष व्लादिमीर झिरिनोव्स्की यांनी एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं की, पक्षाचं ट्विटर खातं हॅक झालं आहे. आमचं खातं पुन्हा सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.
एलडीपीआर टीमने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एलडीपीआरने सांगितलं की, अज्ञात हल्लेखोरांनी आमच्या ट्विटर खात्यावर अनधिकृत प्रवेश केला आहे. आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत आहोत. आमचं ट्विटर खातं रिस्टोर करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहोत.
रशियात नेमकं काय घडतंय?
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेल्या वॅग्नर या ग्रुपनं आत्तापर्यंत पुतिन यांना सर्व प्रकारच्या कारवायांमध्ये साथ दिली. अगदी अलिकडेच रशियानं सुरू केलेल्या युक्रेन युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियन सैन्याच्या बरोबरीने युक्रेनमध्ये कारवाया करत होता. मात्र, याच काळात या दोन्ही सैन्यामध्ये काही खटके उडाल्याचं समोर आलं होतं. वॅग्नरचा प्रमुख प्रिगोझिव्हनं रशियन सैन्यदलाच्या प्रमुखावर फसवणुकीचा आरोप केला होता. युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या पीछेहाटीवरही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले होते. या कलहाचं रुपांतर अखेर शनिवारी वॅग्नरच्या बंडामध्ये झालं.