एका नऊ वर्षांच्या मुलास गोळीबारात जखमी केल्याप्रकरणी बांगलादेशातील सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधीला गुरुवारी अटक करण्यात आली. गोळीबाराच्या या घटनेमुळे बांगलादेशात जनक्षोभ उसळला होता. सत्तारूढ अवामी लीग पक्षाच्या या लोकप्रतिनिधीचे नाव मंजुरूल इस्लाम लिटन असे असून त्यांनी केलेल्या गोळीबारात शहादत हुसेन शूरा हा नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. सदर मुलाच्या काकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न लिटन यांनी केला होता, मात्र गोळी शूरा याला लागली होती.
लिटन यांनी शूराच्या काकांना थांबण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी लिटन यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या लिटन यांनी बंदूक काढून काकांवर गोळ्या झाडल्या, परंतु त्या नऊ वर्षांच्या शूरा याला लागल्या. शूरा सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

Story img Loader