छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी कॉंग्रेसच्या रॅलीवर केलेल्या भीषण हल्ल्याने देशात एकच खळबळ उडाली असून आता हल्ल्यावरून या राज्यात आता राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेची विशेष काळजी घेणाऱ्या सुरक्षा यंत्रणेने काँग्रेसच्या यात्रेकडे दुर्लक्ष केले म्हणून नक्षलवाद्यांना डाव साधता आला असा आरोप या पक्षातर्फे करण्यात आला आहे. कॉंग्रेस नेते रशिद अल्वी यांनी नक्षलवाद्यांनी केलेले हत्याकांड हे राज्यातील भाजपप्रणीत सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री रमण सिंग यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार नसल्याचे अल्वी यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय आदिवासी विकासमंत्री किशोर देव यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्य सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची गरज होती. मात्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करीत रविवारी छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाळला.
कॉंग्रेस नेत्यांच्या या आरोपांचे भाजपने खंडन केले आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या सुरक्षेत कोणतीही हेळसांड झाली  नसल्याचे भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. याप्रकरणी राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन अशा कारवायांविरोधात उभे राहणे गरजेचे आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत योग्य समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
राजकीय नेते ‘टार्गेट’
निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून यात्रा काढणाऱ्या या राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बस्तरमध्ये पाय ठेवू नये, असे आवाहन नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून सर्वात आधी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी बस्तरमधून विकास यात्रेचा पहिला टप्पा सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेसुद्धा बस्तरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व नक्षलवाद्यांनी नेमका डाव साधला. बस्तरमधील लोकप्रिय आदिवासी नेते अशी ओळख असलेले महेंद्र कर्मा व प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल प्रभावी बहुजन नेते होते. या दोघांच्या हत्येमुळे या राज्यात काँग्रेसला प्रदेशपातळीवर नेतृत्वच उरलेले नाही.

नक्षलवादी हल्ल्यांना भीत नाही -राष्ट्रपती
नक्षलवाद्यांनी कॉंग्रेसच्या रॅलीवर केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत अशाप्रकारच्या दहशतवादाला थारा नसून नक्षलवाद्यांच्या या कृत्यांमुळे देशाची जनता घाबरणार नाही, असे राष्ट्रपती म्हणाले. अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सुरक्षा जवानांची बेफिकीरी?
परिवर्तन यात्रेत अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत हे ठाऊक असूनसुद्धा यात्रा जाणार असलेला मार्ग मोकळा करण्याची तसदी जवानांनी घेतली नाही. सुकमा ते जगदलपूर हा मार्ग वर्दळीचा असला तरी या भागात नक्षलवादी नेहमी घात लावून असतात. हे ठाऊक असूनसुद्धा सुरक्षेसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन पोलिसांनी केले नाही. यात्रा जाण्याच्या आधी रस्ता मोकळा करण्यात आला होता, असा दावा स्थानिक पोलीस करीत असले तरी त्यात तथ्य नाही, असे जखमींचे म्हणणे आहे. रस्ता मोकळा करताना पहाडी भाग असेल तर जवानांना ताफा जाईपर्यंत तैनात करून ठेवावे लागते. हल्ला झाला त्या ठिकाणी जवान नव्हते असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.  

Story img Loader