राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी संसद भवनावर झालेल्या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. शनिवारी हल्ल्याचा तेरावा स्मृती दिन होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंग व इतर सदस्यांनी संसदेतील आवारात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात हजेरी लावली. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई, भाजप खासदार मीनाक्षी लेखी, भाकपचे डी.राजा यांच्यासह सर्व नेत्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. काही हुतात्म्यांचे नातेवाईक श्रद्धांजली वाहण्यासाठी संसदेच्या आवारात उपस्थित होते.
‘लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर हल्ला झाला त्यावेळी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मा जवानांना देश विसरणार नाही. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो,’ असे गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. २००१ मध्ये झालेल्या या हल्ल्यात ज्यांनी प्राणांची बाजी लावून लोकशाहीचे रक्षण केले त्या वीर हुतात्म्यांना वंदन करतो, त्यांच्या स्मृती कायम राहतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर भावना व्यक्त केल्या.

Story img Loader