रशियाने युक्रेनला अस्थिर करण्याचे प्रयत्न तातडीने थांबवावेत अन्यथा आणखी नियंत्रणांना तोंड देण्यास सिद्ध व्हावे, असा स्पष्ट इशारा पाश्चिमात्य देशांच्या प्रमुखांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना गुरुवारी दिला. युक्रेनच्या पेचप्रसंगानंतर हे सर्व नेतेगण प्रथमच समोरासमोर आले.
‘जी-७’ गटाच्या देशांची बैठक या आठवडय़ात होत असून हे नेतेगण त्यासाठी येथे आले आहेत.
गेल्या २५ मे रोजी युक्रेनमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचा अर्थ रशियाने समजून घेतलाच पाहिजे, असे आवाहन करून त्या देशाच्या सीमेवरून सैन्य माघारी घ्यावे तसेच युक्रेनला अस्थिर करणे थांबवावे, असे आवाहन या देशांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
दरम्यान, युक्रेनचे नवनिर्वाचित अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांना भेटण्यास आपण तयार असल्याचे पुतिन यांनी सांगितले. कोणालाही टाळण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट करतानाच युक्रेनमध्ये आपल्याकडून लष्करी हस्तक्षेप होत असल्याचा पुतिन यांनी इन्कार केला.
अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या घुसखोरीसंबंधी टिप्पणी करून आपल्याशी चर्चा करावी की नाही, हा सर्वस्वी ओबामा यांचा प्रश्न आहे. आपण चर्चेसाठी तयार आहोत, असेही पुतिन यांनी सांगितले.
युक्रेनमध्ये रशियाने कृष्णकृत्ये केली असल्याचा थेट आरोप करून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचा निषेध केला होता. मात्र, पुतिन यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी ओबामा हे काही प्रमाणात राजी झाले आहेत.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस्को हॉलण्डे हे पॅरीसमध्ये अमेरिका आणि रशियाच्या नेत्यांना स्वतंत्रपणे भेटणार असून चर्चा आणि सैन्य माघारीस आपण पाठबळ दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा