Lebanon Pager Explosion: लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तब्बल दोन हजार ७५० लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त इडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. या घटनेत हिजबुल्लाहचे सैनिक आणि आरोग्य कर्मचारीही जखमी झाले आहेत. तसेच लेबनॉनमधील एक राजदूतही जखमी झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे.
या घटनेनंतर हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने इस्त्रायलबरोबरच्या जवळपास वर्षभर चाललेल्या संघर्षातील सर्वात मोठी सुरक्षेतील त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले असल्याचेही सांगितले जात आहे.
Lebanon Pagers' Blast | 2750 have been wounded and 8 people have died in pagers' detonation across the country, reports Reuters, citing Lebanon Health Minister.
— ANI (@ANI) September 17, 2024
लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे की, देशभरातील पेजर स्फोटांमध्ये २,७५० लोक जखमी झाले आहेत. तसेच या स्फोटमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच लेबनॉनमधील इराणचे राजदूत मोजतबा अमानी हे या स्फोटात जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या काही भागात एकाच वेळी शेकडो हॅन्डहेल्ड पेजरचा स्फोट झाला. ज्यात हिजबुल्लाहचे सदस्य, इराणचे राजदूत आणि इतर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. लेबनॉन सीमेवरील वाढता तणाव पाहता हे स्फोट झाल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
हिजबुल्लाने आपल्या निवेदनात काय म्हटलं?
हिजबुल्लाहने पेजरच्या स्फोटानंतर लगेचच एक निवेदन जारी केले. त्यामध्ये म्हटलं की, हिजबुल्लाहचे सदस्य आणि विविध संस्थांतील अधिकाऱ्यांनी वापरलेल्या अनेक पेजरचा स्फोट झाला. या घटनेत तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर हिजबुल्लाहचे संबंधित अधिकारी या एकाचवेळी झालेल्या स्फोटांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. निवेदनात लोकांना पसरवल्या जात असलेल्या अफवा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये किराणा दुकान आणि बाजारपेठेसह वेगवेगळ्या ठिकाणी हातातील उपकरणे फुटताना दिसत आहेत. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने लेबनॉनमधील सर्व डॉक्टरांना जखमींना मदत करण्यासाठी रुग्णालयात येण्यास सांगितले आहे. तसेच जखमींच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या आहेत. तसेच हिजबुल्लाच्या नेत्याने स्मार्टफोन न वापरण्याचे आवाहनही केले आहे.