पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलवर रॉकेट हल्ला करून युद्ध पुकारलं. इस्रायलनेही हमासच्या रॉकेट हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. गाझा पट्टीतून इस्रायलच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यामुळे सीमेवर अनागोंदी माजली. याचा फायदा घेऊन हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले आणि त्यांनी खुलेआम गोळीबार सुरू केला, तसेच सामान्य नागरिकांची कत्तल सुरू केली. असंख्य इस्रायली महिलांचं आत्तापर्यंत अपहरण करण्यात आलं आहे. हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असताना या युद्धात आता आणखी एका दहशतवादी संघटनेने उडी घेतली आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने उडी मारली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलमधील तीन ठिकाणी रॉकेट आणि बॉम्बहल्ला केला आहे. तसेच हे हल्ले करून हिजबुल्लाहने एक निवेदन जारी केलं आहे. यात हिजबुल्लाहने म्हटलं आहे की, आम्ही इस्रायलवर हल्ला केला आहे. पॅलेस्टाईनवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. दरम्यान, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनानच्या सीमेवर गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं.
हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट आणि मोर्टार हल्ले केले आहेत. लेबनानमधून डागण्यात आलेले रॉकेट्स माउंट दोव्ह प्रांतात कोसळले. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात किती हानी झाली आहे याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच इस्रायलच्या सरकारनेही याबाबत माहिती जाहीर केली नाही. इस्रायली लष्कराने म्हटलं आहे की लेबनानच्या ज्या भागातून इस्रायलवर हल्ले झाले त्या भागावर आम्हीही रॉकेट्स डागले आहेत.
हे ही वाचा >> हमासने इस्रायलवर हल्ला का केला? अमेरिकेने सांगितलं मोठं कारण
इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने (IDF) म्हटलं आहे की, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर आम्हाला कल्पना होती की या भागातून आमच्यावर हल्ले होऊ शकतात. त्यामुळे आम्ही आधीच या भगात बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे तिकडून (लेबनान) हल्ला सुरू झाल्यावर आम्हीही प्रत्युत्तर दिलं. कुठल्याही भागात आमच्या नागरिकांना संरक्षण देण्यास आम्ही समर्थ आहोत.
हे ही वाचा >> इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?
लेबनानमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी शेबा फार्म्स येथील इस्रायली सैन्याच्या एका चौकीवर हल्ला केला आहे. तसेच हल्ल्यानंतर लगेच जाहीर केलं की हा हल्ला आम्ही केला होता. खरंतर हा प्रांत पूर्वी सीरियाच्या ताब्यात होता. परंतु, १९६७ च्या युद्धात (इस्रायल विरुद्ध इजिप्त, सीरिया, जॉर्डन, इराक, सौदी अरब, कुवैत) हा भाग इस्रायलने ताब्यात घेतला. परंतु, शेबा फार्म्ससह केफर चौबा हा डोंगराळ प्रदेश आमचा असल्याचा दावा सातत्याने लेबनानने केला आहे. याच भागात आता लेबनानने हल्ला करून पुन्हा एकदा या प्रदेशावर दावा केला आहे. इस्रायलने १९७६ मध्ये हा प्रांत ताब्यात घेतल्यानंतर १९८१ मध्ये गोलान हाइट्स हा प्रदेशही आपल्या ताब्यात घेतला आहे.