एलईडी दिव्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत असतानाच आता वैज्ञानिकांनी या दिव्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाईट एमिटिंग डायोडची किंमत कमी करणारे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. नवीन एलईडीमधील हे प्रकाशोत्सर्जक डायोड हे कार्बन व अकार्बनी पदार्थाचे बनलेले आहेत. या संशोधनात भारताचे गणेश बडे, शिन शान व जुनकिआंग या फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा समावेश आहे. अॅडव्हान्स्ड मटेरियल्स या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या औद्योगिक व उत्पादन अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक झुबीन यू यांनी सांगितले, की या नवीन तंत्रज्ञानामुळे एलईडी स्वस्त होतील व सध्या ते महाग आहेत हीच खरी समस्या आहे. या दिव्यांमुळे वीज वाचते, पण ग्राहकांना दिव्याच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात व आता नवीन तंत्रज्ञानामुळे या दिव्यांची किंमत कमी होईल. यू यांनी नवीन एलईडी तंत्रज्ञान विकसित केले असून निळा, हिरवा व लाल अशा रंगांतील एक पदार्थ शोधून काढण्यात आला असून, तो या दिव्यांमध्ये वापरला जाईल व या नवीन तंत्रज्ञानाने एलईडी दिव्यांचे उत्पादन आणखी सोपे होणार आहे. एलईडी दिव्याचा विशिष्ट परिणाम जाणवण्यासाठी सध्या त्यात एका विशिष्ट रासायनिक पदार्थाचे चार ते पाच थर द्यावे लागतात. यू यांनी असा पदार्थ शोधला आहे, की हे काम केवळ एका थरातच पूर्ण होते. जास्त थर द्यावे लागणे हे त्यातील तांत्रिक आव्हान होते.
यू यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने गौरवले असून ते आता या विषयात पुढे संशोधन करीत आहेत. ताणले जाऊ शकतील असे एलईडी डिस्प्ले तयार करण्याचा त्यांचा विचार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा