गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी गुजरात सरकारवर केलेल्या आरोपांवरून गुरुवारी राज्यसभेमध्ये डावे आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. वंजारा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरचिटणीस अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची मागणी या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी केली. अध्यक्षांनी या विषयावर चर्चेस नकार दिल्यावर डाव्या पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
वंजारांचा राजीनामा सरकारने फेटाळला

गुरुवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर लगेचच डावे आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा देत तातडीने या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, तातडीने चर्चा घेण्याची त्यांची मागणी राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी फेटाळली. मागणी फेटाळल्यानंतर या सदस्यांनी अजून जोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. देशाचे माजी राष्ट्रपती आणि राज्यसभेचे पहिले अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याचे निवेदन वाचू देईपर्यंत सदस्यांनी आपल्या जागेवर जाऊन बसावे, असेही कुरियन यांनी सदस्यांना सांगितले. मात्र, सदस्य ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना कामकाज तहकूब करावे लागले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही या सदस्यांनी वंजारा… वंजारा… म्हणून घोषणा देणे सुरूच ठेवले.