मुंबईत विविध कामगार संघटनांनी पुकारलेला ४८ तासांचा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोकसभेतील गटनेते गुरुदास दासगुप्ता यांनी हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाकप आणि शिवसेनेने मिळून उद्यापासून सुरू होणारा दोन दिवसांचा बंद यशस्वी करावा म्हणून गुरुदास दासगुप्ता यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दासगुप्ता यांनी एक महिन्यापूर्वी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतल्याचे भाकप सूत्रांचे म्हणणे आहे.
कॉम्रेड श्रीपाद डांगे यांनी मुंबईत उभी केलेली डावी चळवळ तुडवून काढणाऱ्या शिवसेनेच्या इतिहासाकडे मुंबई बंद यशस्वी करण्यासाठी दासगुप्ता यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने कानाडोळा करावा, याचा संतापही डाव्या पक्षांच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
चार दशकांपूर्वी मुंबईत कम्युनिस्ट विचारधारा नेस्तनाबूत करताना कॉम्रेड कृष्णा देसाईचा खून पाडल्याचा आरोप शिवसेनेवर केला जातो. अशा शिवसेनेशी कामगार आंदोलन यशस्वी करण्यासाठी हातमिळवणी करण्याची वेळ डाव्या पक्षांवर आल्याचे दु:ख डावे नेते खासगीत व्यक्त करीत आहेत.

Story img Loader