नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनांच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (आयइसा) आणि ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फ्रंट’ (डीएसएफ) यांच्या डाव्या आघाडीने चार केंद्रीय पदांपैकी तीन तर, संघाशी निगडीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एका पदावर बाजी मारली. दशकभरानंतर ‘अभाविप’ला केंद्रीय पद जिंकता आले. गेल्या वर्षी डाव्या विद्यार्थी संघटनांनी एकत्रित लढवलेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व चारही पदे जिंकली होती.
‘आयइसा’चे नितीशकुमार यांची अध्यक्षपदी तर, ‘डीएसएफ’च्या मनीषा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ‘डीएसएफ’चे मुंतेहा फतिमा यांनी सरचिटणीसपदी विजय मिळवला तर, ‘अभाविप’चे वैभव मीणा यांना संयुक्त सचिवपदी निवडण्यात आले. २०१६नंतर पहिल्यांदाच ‘अभाविप’चा सदस्य ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या केंद्रीय पदावर निवडून आला आहे. असे असले तरी डाव्या विद्यार्थी संघटनांनी यावर्षीदेखील दबदबा कायम ठेवला.
यावर्षी सर्व कम्युनिस्ट संघटना एकत्र आल्या नव्हत्या. ‘आयइसा’ व ‘डीएसएफ’ या संघटनांनी युती केली होती तर ‘एसएफआय’, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (बापसा) आणि ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशन’ (पीएसए) या संघटनांनी आघाडी केली होती. दरम्यान, ‘अभाविप’ने ४२पैकी २३ कौन्सिलर पदे जिकली. ‘स्कूल ऑफ सोशल सायन्सेस’ आणि ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांना धक्का देत पाच जागांपैकी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या, असे ‘अभाविप’ने निवडणूक निकालानंतर म्हटले आहे