तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या अध्यक्ष जयललिता यांच्या एककल्ली व एकसुरी कारभाराला कंटाळून भाकप व माकप या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वीच उभय पक्षांनी जयललितांशी युती केली होती.
ताळिनाडूत लोकसभेच्या एकंदर ३९ जागा आहेत. जागावाटपासाठी उभय पक्षांची अण्णाद्रमुकशी चर्चा सुरू होती. मात्र, जयललितांनी दोन्ही पक्षांना न विचारता परस्पर सर्व जागांवर आपल्याच पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यांच्या या एककल्ली व एकसुरी निर्णयाला वैतागून त्यांच्याशी केलेली युती मोडीत काढण्याचा निर्णय उभय पक्षांनी घेतला. भाकपचे डी. पांडियन व माकपचे जी. रामकृष्णन यांनी संयुक्तपणे निवेदन जारी करत जयललितांशी काडीमोड घेत असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचेही दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
डीएमडीके-भाजप युती?
तामिळनाडू विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डीएमडीकेने भाजपसमवेत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. डीएमडीके पक्ष तामिळनाडूत आघाडी करून लढणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. भाजपसमवेत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू झाली असल्याचे डीएमडीकेचे नेते विजयकांत यांनी सांगितले. भाजपने उमेदवारांची कच्ची यादी तयार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left jayalalithaa deal may come to an end
Show comments