डाव्या पक्षांनी यूपीए सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यास त्याला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देईल, अशी घोषणा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केली. तृणमूल आणि डावे पक्षातील राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीवरून ( एफडीआय) अविश्वास ठराव आणण्याच्या तृणमूलच्या प्रस्तावाला डाव्यांनी पाठिंबा देण्याचे नाकारले आहे. डाव्यांच्या या निर्णयानंतर बुधवारी ममतांनी  नवी भूमिका घेत अविश्वास ठरावाचा चेंडू डाव्याच्या कोर्टात टोलविला असल्याचे मानले जात आहे.
    या विषयावर गरज भासल्यास माकपच्या राज्य मुख्यालयात जाऊन माकप सरचिटणीस बिमन बोस यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे ममतांनी स्पष्ट केले. अल्पमतामध्ये असलेल्या यूपीए सरकारला जीवदान मिळेल अशी कोणतीही कृती माकपने करू नये, असे आवाहनही ममतांनी यावेळी केले.
भाजपशी तृणमूल काँग्रेसचे काही मुद्दय़ांवर मतभेद असले तरी देश हिताच्या मुद्दय़ावर भाजपाचा पाठिंबा घेण्याची आपली तयारी असल्याचे ममतांनी स्पष्ट केले. भ्रष्ट आणि लोकहितविरोधी यूपीए सरकारला जीवदान देणाऱ्या पक्षांकडे जनतेचे लक्ष आहे, याची जाणीव सर्वानी ठेवावी असा इशाराही ममतांनी यावेळी दिला.     

Story img Loader