२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानही या प्रकरणातील आरोपींना शिक्षा करण्यासाठी कायदेशीर कारवाई करील अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे.
खुर्शीद म्हणाले की, खरे सांगायचे तर आम्ही अजमल कसाबच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेच्या अंमलबजावणीस वाव दिला, आता पाकिस्ताननेही कायदेशीर प्रक्रियेनुसार मुंबई हल्ल्यात सामील असलेल्या म्होरक्यांना शिक्षा घडवावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण भारत व पाकिस्तान या दोन देशातील गुन्हेगारी दंड संहितेत फारसा फरक नाही. जर कायदेशीर प्रक्रियेला पुरेसा वाव दिला तर पाकिस्तानही या अप्रिय व आमच्या देशातील जनतेला दु:खी करणाऱ्या या घटनेची इतिश्री करण्यासाठी सर्वकाही केले असे म्हणू शकेल.
पाकिस्तानकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले असता त्यांनी वरील विवेचन केले. ते म्हणाले की, भारताने कसाबच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेला वाव दिला, त्याची दयेची याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. याचा अर्थ आमच्या देशात सगळे समान आहेत. कायदा सगळ्यांना सारखाच आहे, हे स्पष्ट झाले आहे. कायदेशीर गरजेनुसार आम्ही पाकिस्तान सरकार व कसाबच्या कुटुंबीयांनाही त्याला फाशी देत असल्याचे कळवले होते. कसाबला आज सकाळी फाशी देणार आहे ही बाब पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयास फॅक्सने कळवण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने तो संदेश स्वीकारला नाही, असे खुर्शीद म्हणाले.
पाकिस्तानला फाशीबाबत माहिती देण्याचे सर्व सोपस्कार आम्ही पूर्ण केले आहेत व कसाबचा पत्ताही आमच्याकडे होता त्याच्या कुटुंबीयांना त्या पत्त्यावर कळवण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
कसाबने दिलेल्या पत्त्यावर त्याला फाशी देत असल्याबाबत कुरियरने संदेश पाठवण्यात आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.    
घटनाक्रम
२६/११/२००८ : अजमल कसाब आणि नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला. कॅफे लिओपोल्ड, हॉटेल ताज, सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय परिसर, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस येथे हल्ला. हल्ल्याच्या रात्रीच पोलिसांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबला जिवंत पकडून देताना सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे शहीद.  हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसाब व इस्माईलकडून हत्या.
*  २७ नोव्हेंबर : कसाबकडून गुन्ह्य़ाची कबुली. पाकिस्तानातून आल्याचा जबाब.
* २९ नोव्हेंबर : हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमधील कारवाई संपुष्टात.
*  ३० नोव्हेंबर : प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द. कसाबविरुद्ध दाखल १२ गुन्’ाांसाठी १२ तपास पथकांची स्थापना. तत्कालिन सहआयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्त्वाखाली तपासाला सुरुवात.
*  १८ डिसेंबर : फईम अन्सारी व सबाउद्दीन शेख या दोघा भारतीयांना प्रकरणातील सहआरोपी म्हणून अटक.
*  २७ व २८ डिसेंबर : आर्थर रोड तुरुंगात कसाबची ओळखपरेड.
*  १३ जानेवारी २००९ : २६/११च्या हल्ल्याशी संबंधित खटल्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशपदी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांची नियुक्ती.
* १६ जानेवारी : कसाबच्या सुरक्षेच्या दृष्टीने २६/११चा खटला आर्थर तुरुंगातील विशेष न्यायालयात चालविण्याची घोषणा.
* २० व २१ फेब्रुवारी : अतिरिक्त महानगरदंडाधिकारी व्ही. सावंत-वाघुले यांच्यासमोर कसाबचा कबुलीजबाब.
* २२ फेब्रुवारी : खटल्यात अभियोग पक्षाची बाजू मांडण्याकरिता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती.
* २५ फेब्रुवारी : कसाबसह फईम, सबाउद्दीन आणि ३५ पाकिस्तानी फरारी आरोपींविरुद्ध महानगरदंडाधिकारी न्यायालयात ११ हजार ३५० पानांचे आरोपपत्र दाखल.
* ९ मार्च : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशीसंबंधित खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयाकडे वर्ग.
*३० मार्च : ‘लीगल एड पॅनेल’मधून अॅड. अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून, तर अॅड. के. पी. पवार यांची वाघमारे यांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती.
* १५ एप्रिल : आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात. खोटे बोलल्याचे उघड होताच सुनावणीच्या पहिल्या दिवशीच  अॅड. वाघमारे यांची नियुक्ती रद्द.
* १६ एप्रिल : अॅड. अब्बास काझ्मी यांची कसाबचे नवे वकील म्हणून नियुक्ती.
* १७ एप्रिल : कबुलीजबाबवरून कसाबचे घूमजाव.
* १८ एप्रिल : अल्पवयीन असल्याचा कसाबचा दावा.
* २० एप्रिल : अभियोग पक्षातर्फे कसाबसह तिघा आरोपींवर ३१२ आरोपांचा मसुदा सादर.
* २८ एप्रिल : कसाबचा अल्पवयीन नसल्याचा अहवाल डॉक्टरांच्या पथकाकडून न्यायालयात सादर.
* २ मे : कसाबचा अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला.
* ६ मे : कसाबसह तिघा आरोपींवर ८६ आरोप निश्चित.
* ८ मे : खटल्यातील पहिले साक्षीदार म्हणून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गिरगाव चौपाटी प्रकरणातील तक्रारदार भास्कर कदम यांची साक्ष.
* २३ जून : २६/११च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद व झकी-उर रहमान यांच्यासह २२ फरारी दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी.
* २० जुलै : न्यायालयात अचानक उभे राहून आपल्याविरुद्ध लावलेले सर्व गुन्हे कबूल असल्याचे सांगत कसाबने कबुलीजबाब दिला.
* २० ते २१ जुलै : न्यायालयाकडून कसाबच्या कबुलीजबाबाची नोंद.
* २४ जुलै : करकरे, कामटे आणि साळसकर यांच्या हत्येचे एकमेव साक्षीदार असलेले
पोलीस हवालदार अरूण जाधव यांची साक्ष.
* १२ ऑक्टोबर : भारतीय न्यायालयावर विश्वास नसल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालविण्याची कसाबची मागणी.
* १९ नोव्हेंबर : तुरुंगातील जेवणात गुंगीचे औषध मिसळले जात असल्याचा आरोप.
* २६ नोव्हेंबर : ‘गैरवर्तणुकीमुळे तुमची नियुक्ती रद्द का करू नये’, अशी न्यायालयाची अॅड. काझ्मी यांना नोटीस.
* ३० नोव्हेंबर : विनाशर्त माफी न मागितल्याने अखेर न्यायालयाकडून अॅड. काझ्मी यांची हकालपट्टी.
* १ डिसेंबर : अॅड. काझ्मी यांच्याजागी अॅड. के. पी. पवार यांची कसाबचे नवे वकील
म्हणून, तर अॅड. विनोद मोरे यांची त्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती.
* १६ डिसेंबर : अभियोग पक्षातर्फे साक्षीपुराव्यांच्या कामकाज पूर्ण.
* १८ डिसेंबर : न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांसंदर्भात फौजदारी दंडसंहितेच्या कलम ३१३ अन्वये कसाबच्या स्पष्टीकरणास नोंदविण्यास सुरुवात. या वेळी कसाबचे कबुलीजबाबावरून ‘घूमजाव’
* ११ फेब्रुवारी २०१० : आरोपी फईम अन्सारी याचे वकील शाहीद आझमी यांची हत्या.
* ९ मार्च : अभियोग पक्षातर्फे खटल्यातील अंतिम युक्तिवादाला सुरुवात. गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री अशोक बागवे यांची विशेष उपस्थिती.
* २५ ते ३१ मार्च : कसाबतर्फे अॅड. के. पी. पवार, फईमच्या वतीने अॅड. आर. बी. मोकाशी, तर सबाउद्दीनच्या वतीने अॅड. एजाज नक्वी यांनी अंतिम युक्तिवाद केला.
* ३१ मार्च : ३ मे रोजी खटल्याचा निकाल देणार असल्याची न्या. टहलियानी यांची घोषणा. ६ मे रोजी : कसाबला फाशीची शिक्षा.
* २१ फेब्रुवारी २०११ : उच्च न्यायालयाकडून कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब.
* मार्च २०११ : शिक्षेविरोधात अपील दाखल करण्याकरिता कसबाचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र.
* १० ऑक्टोबर : कसाबचे सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान.  
* १८ ऑक्टोबर : सबाउद्दीन आणि फईमच्या सुटकेविरुद्धचे अपील दाखल.
* २५ एप्रिल २०१२ : सर्वोच्च न्यायालयाने खटल्याला निकाल राखून ठेवला.
*  २९ ऑगस्ट : फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडूनही कायम.
* १६ ऑक्टोबर : कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींना शिफारस.
* ५ नोव्हेंबर : राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.
* ८ नोव्हेंबर : राज्य सरकारला राष्ट्रपतींचा निर्णय कळविण्यात आला.
* २१ नोव्हेंबर : येरवडा तुरुंगात कसाबला सकाळी ७.२६ वाजता फाशी देण्यात आली. देशभरात वृत्त वाऱ्यासारखे पसरले.