लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघातील सर्व घटकांना जबाबदार असल्याने त्याच्यामध्ये परिपूर्ण दृष्टिकोन असणे गरजेचे आहे, असे मत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
ज्यांनी तुम्हाला मतदान केले त्यांनाच तुम्ही जबाबदार नाहीत, तर ज्यांनी मतदान केले नाही त्यांची जबाबदारीही तुमच्यावरच आहे. त्यामुळे आपला दृष्टिकोन आणि कार्य परिपूर्ण असले पाहिजे. आपण केवळ आमदारच नाही तर अग्रस्थानी राहून नेतृत्व करणारे नेते आहात, असेही महाजन म्हणाल्या. आंध्र प्रदेशातील आमदारांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी त्या बोलत होत्या.
आमदारांनी केवळ आपल्या मतदारसंघाचाच विचार करू नये, तर संपूर्ण राज्याचा विचार करून पावले उचलली पाहिजेत. आपल्याबद्दल आदर कमवावा लागतो, तो मागता येत नाही. त्यामुळे आमदारांनी नैतिक मूल्यांबाबत ठाम राहिले पाहिजे. अशा प्रकारे वर्तणूक ठेवल्यास सार्वजनिक जीवनातील पाया भक्कम होतो, असेही त्या म्हणाल्या.
आपण किती महान आहोत हे दाखविण्याची सध्या अहमहमिका सुरू आहे, मात्र आपण महान कसे होऊ ते महत्त्वाचे आहे. जनतेची सेवा करण्यासाठी आमदार म्हणून निवडून येणे हा सन्मान आहे, मात्र त्याबरोबरच जबाबदारीचेही भान राखले पाहिजे, असेही महाजन म्हणाल्या.

Story img Loader