२०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान एका व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ही व्यक्ती कुठल्या पक्षाची उमेदवार किंवा कोणत्या पक्षाची स्टार कॅम्पेनर नव्हती, तर ती व्यक्ती एक निवडणूक अधिकारी होती. अर्थात सरकारी कर्मचारी अशा प्रकारे कोणतीही टीका न होता व्हायरल होण्याची ही अपवादात्मकच बाब होती. ही व्यक्ती म्हणजे एक महिला निवडणूक अधिकारी आहे. रीना द्विवेदी असं त्यांचं नाव असून त्यांचे लिंबू कलरच्या साडीमधले फोटो तुफान व्हायरल झाले होते. सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेल्या रीना द्विवेदी यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यंदा त्यांचे वेस्टर्न लुकसोबतच जुने ‘लिंबू कलर’ साडीतले फोटो देखील पुन्हा व्हायरल झाले आहेत.
रीना द्विवेदी यांचे फोटो यंदाही प्रचंड व्हायरल होत आहेत. पण यावेळी लिंबू कलरच्या साडीची जागा वेस्टर्न लुकनं घेतली आहे. ब्लॅक कलरच्या स्लीवलेस ड्रेसमधले त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. रीना द्विवेदी यांची नियुक्ती उत्तर प्रदेशमधल्या मोहनलालगंज विधानसभा मतदारसंघात करण्यात आली होती. या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान झालं आहे. मात्र, त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांविषयी लोकांच्या मनातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
“मला फोन यायला लागल्यानंतर समजलं की..”
रीना द्विवेदी यांनी एबीपीशी बोलताना आपला अनुभव सांगितला आहे. “मला स्वत:ला आश्चर्य वाटतंय की इतक्या लोकांना हा फोटो आवडला. मला नंतर कळलं तुषार आजमी यांनी हा फोटो काढला आणि व्हायरल केला. नंतर मला फोन यायला लागले की तुमचे फोटो फार चांगले आले आहेत. तेव्हा मला हे सगळं समजलं”, असं रीना द्विवेदी म्हणाल्या.
Photos: ‘लिंबू कलर साडी’ फेम ‘ती’ महिला अधिकारी यंदा वेस्टर्न लूकमध्ये पोहचली मतदान केंद्रावर अन्…
“मी तर सामान्य पद्धतीनेच काम करत होते. जो माझा वेश होता, तो नेहमीचाच होता. त्या दिवशी तो लोकांसमोर आला एवढंच. त्या काहीही दिखावा नव्हता”, असं देखील द्विवेदी यांनी नमूद केलं.
“सरकारी कर्मचारी म्हणजे सुस्त असं का?”
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांची लोकांच्या मनात चुकीची प्रतिमा असल्याचं रीना द्विवेदी यांनी यावेळी नमूद केलं. “मला कळत नाही की लोकं असा विचार का करतात की सरकारी कर्मचारी म्हटल्यावर सुस्त, दमलेला, आजारीच असेल. असं नसतं. सरकारी सेवेत देखील एकाहून एक कर्मचारी-अधिकारी आहेत. ते चांगलं राहणीमान ठेवतात. आपण खासगी क्षेत्रात असू वा सार्वजनिक क्षेत्रात, आपल्या कामाचा आपण आनंद घेतला पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.