राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) प्रमुख नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएतील एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची (कॅबिनेट अथवा राज्यमंत्री) शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक मित्रराष्ट्रांचे प्रमुख, देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, सेलिब्रेटींसह तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाला एक निमंत्रण नसलेला पाहुणादेखील आला होता. या पाहुण्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा केवळ १२ सेकंदांचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये दिसतंय की, शपथविधी चालू असताना एक पाहुणा राष्ट्रपती भवन परिसरात फिरत होता. शपथविधीवेळी तो मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून ऐटीत चालत जात होता. खासदार दुर्गादास उइके मंत्रिपदाची शपथ घेत असताना हा पाहुणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दुर्गादास उइके मंत्रिपदाची शपथ घेत असताना मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून एक जंगली प्राणी चालत जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा कोणता प्राणी होता ते अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र काही समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा बिबट्या होता. मात्र हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे हा बिबट्याच होता असा दावा करता येणार नाही.
हे ही वाचा >> “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?
हा बिबट्या असेल तर याचा अर्थ शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कसर राहिली होती. हा बिबट्या असेल तर यामध्ये एक चांगली गोष्ट अशीही आहे की, तो मंचाजवळ फिरकला नाही. तो मंचाजवळ गेला असता तर मोठा गोंधळ उडाला असता. या गोंधळामुळे बिबट्यादेखील बिथरला असता. त्यामुळे त्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तो मंचाजवळ न फिरकल्यामुळे मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल.