रहिवासी परिसरात बिबट्या शिरण्याच्या घटना अनेकदा आपण ऐकल्या आहेत आणि वाचल्या आहेत. मात्र, गुरूवारी सकाळी गुडगावच्या मानेसर येथील मारूती सुझुकी कंपनीमध्ये बिबट्या शिरला. इंजिन विभागात तो गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. बिबट्या शिरल्याचे समजताच तातडीने पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. या सगळ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज बघून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
बिबट्या कंपनीच्या इंजिन विभागात गेल्यामुळे कंपनीचे काम थांबवण्यात आले. आम्ही बिबट्याला शोधतो आहोत. मात्र, त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काम थांबवल्यामुळे अनेक कर्मचारी कंपनीच्या गेटबाहेर येऊन बसले आहेत.
काही दिवसांपूर्वी गुडगावमध्ये एक नरभक्षक बिबट्या आल्याची माहिती मिळाली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात या बिबट्याने ९ जणांची शिकार केली होती, यामध्ये एका पोलिसाचाही समावेश होता. तर यावर्षीच्या एप्रिल महिन्यात हा बिबट्या गोल्फ कोर्स भागात दिसला होता. आता मारूती सुझुकी कंपनीतही बिबट्या शिरला आहे. हा बिबट्या नरभक्षक बिबट्या आहे की नाही, हे ठाऊक नाही. मात्र, बिबट्याला जेरबंद करेपर्यंत सगळ्यांचाच जीव टांगणीला लागून राहणार आहे.