वॉशिंग्टन : सध्या मल्टिपल मायलोमा या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वेदनादायी बायोप्सीला पर्याय म्हणून कमी खर्चाची रक्तचाचणी विकसित करण्यात आली असून त्यात प्लास्टिक चिपचा वापर करण्यात आला आहे.
ही चिप क्रेडिट कार्डच्या आकाराची आहे. अमेरिकेतील कन्सास विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मल्टिपल मायलोमा या कर्करोगात प्रभावित होणाऱ्या प्लाझ्मा पेशींसाठी वापरली जाणारी हाडाची बायोप्सी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची जागा ही नवी चाचणी घेणार असून यात अस्थिमज्जेचा नमुना घेण्यासाठी सुई घालावी लागत होती ती पद्धत वेदनादायी होती. इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी नियतकालिकात नवीन रक्तचाचणीचा उल्लेख असून त्यात प्लास्टिकची क्रेडिट कार्डच्या आकाराची चीप वापरून माहिती घेतली जाते.
यात नेहमी रक्त घेतले जाते त्याच पद्धतीने रक्त घेऊन तपासणी करतात. दहा वर्षांत ही चाचणी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते असे स्टीव्हन सोपर यांनी सांगितले. यात कर्करोगाची अवस्था कळू शकते व कोणत्या प्रकारचे औषध लागू पडेल हे ठरवता येते. सीडी, डीव्हीडी व ब्लू रे डिस्क तयार करण्याच्या पद्धतीने प्लास्टिक चिप तयार केली जाते.
काही डॉलर्स खर्चात चिप तयार करता येते त्यामुळे रोगनिदान स्वस्तात होते.