पुणे : देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने उच्च शिक्षणातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता या विषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘यूजीसी’चे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची १७ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदारनोंदणीसाठी संस्थास्तरावरील आराखडा तयार करून ‘एआयएसएसई’ आणि ‘यू-डायस’ संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदारनोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक-प्राध्यापकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान आणि त्याबाबतचे प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी; तीन फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर

निवडणूक प्रक्रियेमध्ये, विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाईल. निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन जागरूक करण्याचा उद्देश आहे.

शिक्षण संस्थांमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन’

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अभिरूप निवडणूक (मॉक पोल) घेतली जाणार आहे. तसेच येत्या २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lessons of electoral process in educational curriculum pune amy