दिल्लीतील पाच वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार आणि टूजी घोटाळ्याप्रकरणी जेपीसीचा अहवाल यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे असे आवाहन आज केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उरलेल्या काळात संसद आर्थिक बाबींशी निगडीत सर्व मुद्यांवर निर्णय घेण्यास यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रमुख आर्थिक निर्णय हे संसदेसमोर असून संसदेचे हे उर्वरित अधिवेशन अतिशय महत्वाचे असल्याचे ते सिंग म्हणाले. तसेच अन्न संरक्षण विधेयक, जमिन हस्तांतरण विधेयकावर देखिल निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज चालू द्यावे अशी माझी सभागृहाला नम्र विनंती असल्याचं ते म्हणाले.
विरोधकांचे काही मुद्दे असतील तर आम्ही त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत, असं पंतप्रधान पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
देशासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी आम्हाला नागरिकांनी निवडून दिले असून त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असंही सिंग पुढे म्हणाले. (पीटीआय)

Story img Loader