येत्या काही दिवसात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये सध्या सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. असं असताना आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी विमानप्रवासात घडलेली एक घटना सांगितली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, ”विमानातून प्रवास करताना, एक भाजपाचा नेता मला भेटला होता. त्याच्याशी गप्पा सुरू असताना मी त्याला विचारलं की, गुजरातमध्ये तुमची सत्ता असूनही तुम्ही काम का करत नाहीत? यावर तो म्हणाला की, आम्हाला काम करण्याची गरज काय? येथील लोकं आम्हाला मतदान करत आहेत. संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते आमच्या खिशात आहेत. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ते आमच्याकडे येऊ शकतात.”

हा प्रसंग सांगून केजरीवालांनी गुजरातच्या साडेसहा कोटी जनतेला आवाहन केलं की, “भाजपाचा हा अहंकार तोडण्यासाठी आम आदमी पार्टीला एक संधी द्या. जर आम्ही काम करत नाही, असं तुम्हाला वाटलं तर पुढच्या वेळी आम्हाला मतं देऊ नका. पण एक संधी द्या” अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते गुजरातमधील भरूच येथे रविवारी आयोजित केलेल्या आदिवासी संकल्प महासंमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

“मी एक प्रमाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यक्ती आहे. त्यांनी माझ्यामागे अनेक तपास यंत्रणा लावल्या. पण त्यांना काहीही सापडलं नाही,” असंही अरविंद केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले. विशेष म्हणजे अलीकडेच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं मोठं यश संपादन केलं आहे.

Story img Loader