दिल्ली वारीला असलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या संभाव्य पंतप्रधानपदाचा उमेदवारम्हणून होणाऱ्या चर्चेवर “आधी भाजपमध्ये त्याची चर्चा होऊ द्या, त्यानंतर शिवसेना भूमिका मांडेल” असे म्हटले आहे. त्यांनी आज शनिवार नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मोदींच्या नावाला आमचा विरोध नसून, उलट त्यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छाही दिल्या. परंतु, भाजपने अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे यावर आधीच काही बोलणे योग्य नाही. त्याचबरोबर संभाव्य पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची भाजपमध्येही अजून कोणतीही चर्चा नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लखनभैय्या चकमक प्रकरणावरून शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिसांना पाठिंबा दर्शविला. यावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ” शिवसेनेने पाठिंबा दर्शविल्यानंतर आता इतर पक्षांचीही या प्रकरणावर भूमिका घेण्याची हिम्मत होत आहे. ही चांगली गोष्ट आहे.” असे म्हटले.
मोदींच्या ‘मी हिंदूराष्ट्रवादी’ या विधानावर उद्धव ठाकरेंनी यात मोदींचे काय चुकले? असा प्रश्न उभा करून मोदींच्या हिंदुत्ववादी विधानाला पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर शिवसेनेही हिंदुत्ववादात माघार घेतलेली नाही. मी हिंदुत्ववादी आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या समान गुणधर्मावरूनच भाजप-शिवसेना युती झाली होती. हेही विसरता कामा नये असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पत्रकारपरिषदेत केंद्रसराकरवर हल्लाबोल करत अन्नसुरक्षा विधेयक म्हणजे निवडणुका जवळ आल्याने मत मिळविण्यासाठी काँग्रेसने सोडलेले पिल्लू असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.