नासाचे माजी अधिकारी अ‍ॅलन स्टर्न यांनी लोकांना चंद्राची सहल घडवण्यासाठी अनुभव पणाला लावला असून २०२० पर्यंत ते हे स्वप्न पूर्ण करणार आहेत. दोन व्यक्तींना चंद्रावर नेऊन आणण्याचे हे पॅकेज दीड अब्ज डॉलरचे आहे. त्यामुळे नवपरिणीतांनो चंद्रावर हनिमूनला जायचे असेल तर दीड अब्ज डॉलर आतापासून साठवायला लागा.
‘गोल्डन स्पाइक’ या कंपनीच्या माध्यमातून हे चांद्र सहलीचे पॅकेज दिले जाणार असून तुम्ही त्यासाठी घासाघीस करून काही किमत कमीही करू शकणार आहात. अ‍ॅलन स्टर्न हे नासाच्या विज्ञान मोहिमा संचालनालयाचे माजी संचालक असून ते सध्या गोल्डन स्पाइक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी लोकांना हे चांद्र सफरीचे स्वप्न दाखवले आहे, असे स्पेस डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटले आहे. आशिया व युरोपातील देशांच्या अंतराळ संस्थांशी आम्ही याबाबत बोललो आहोत असे स्टर्न यांनी सांगितले. ज्या देशांना लोकांना चंद्रावर पाठवणे शक्य नाही ते या कंपनीचे ग्राहक असणार आहेत. खासगी पातळीवरही ही सेवा उपलब्ध असणार आहे. स्टर्न तसेच गोल्डन स्पाइक कंपनीचे अध्यक्ष गेरी ग्रिफीन यांनी  चंद्रावरील अखेरच्या मानव मोहिमेच्या वर्धापन दिनी म्हणजे ७ डिसेंबरला ही योजना घोषित केली आहे. ७ डिसेंबर १९७२ रोजी अपोलो १७ ही शेवटची समानव चांद्रमोहीम चंद्रावर उतरली होती. या योजनेत कुठला प्रक्षेपक वापरायचा की अंतराळ कुपी वापरायची हे अजून ठरलेले नाही. २०१४ पर्यंत चंद्रावर पाठवावयाच्या व्यक्तींची निवड केली जाणार आहे. या कंपनीला स्वत:चे वाहन तयार करावे लागणार असून स्पेससूटची निर्मितीही करावी लागणार आहे. गुगल ल्युनर एक्स पुरस्कारा अंतर्गत, जी बिगर सरकारी संस्था १६५० फूट अंतर चालेल असा यंत्रमानव चंद्रावर उतरवेल व माहिती तसेच छायाचित्रे पृथ्वीवर पाठवेल तिला ३ कोटी डॉलर बक्षीस दिले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा