अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने मंडी या ठिकाणाहून तिकिट दिलं आहे. कंगनाचा या निमित्ताने राजकारणात प्रवेश झाला आहे. अशातच कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली याचं कारण काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबुक आणि इंस्टा अकाऊंटवरुन कंगनाचा एक अश्लील फोटो पोस्ट करण्यात आला. तसंच त्या फोटोला दिलेली कॅप्शनही वादग्रस्त होती. तो फोटो व्हायरल झाल्यावर सुप्रिया श्रीनेत यांनी ती पोस्ट हटवली. अशात कंगनाने त्यांच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर हे प्रकरण आता निवडणूक आयोगाच्या दारात गेलं आहे. कारण राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे पोस्टचं प्रकरण?

हिमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणाहून कंगनाला उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाच्या तिकिटावर कंगना या मतदारसंघातून लढणार आहे. हाच संदर्भ घेत काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन कंगनाचा अर्धनग्न फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली वादग्रस्त ओळी लिहिण्यात आल्या. त्यावरुन कंगनाने तिखट शब्दांत सुप्रिया श्रीनेत यांना सुनावलं आहे. तसंच या प्रकरणी भाजपानेही काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. आता या प्रकरणात सुप्रिया श्रीनेत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे महिला आयोगाने?

राष्ट्रीय महिला आयोग सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या पोस्टचा निषेध नोंदवतो. एखाद्या महिलेबाबत अशाप्रकारे पोस्ट करणं आणि त्यावर चुकीच्या गोष्टी पसरवणं ही बाब महिलेचा अपमान करणारी आहे. निवडणूक आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर तातडीची कारवाई केली पाहिजे. तसंच महिलेचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे ही समज प्रत्येकाला दिली पाहिजे. सोशल मीडिया असो किंवा प्रत्यक्षपणे बोलणं असो कुठल्याही महिलेबाबत अशी पोस्ट करणं, तिचा अपमान करणं निषेधार्ह आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा तो अपमान आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे.

कंगना रणौतची प्रतिक्रिया काय?

एक कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. ‘क्वीन’मधील एका भोळ्या मुलीपासून ते ‘धाकड’मधील मोहक गुप्तहेरपर्यंत, ‘मणिकर्णिका’तील देवीपासून ‘चंद्रमुखी’तील राक्षसापर्यंत, ‘रज्जो’मधील वेश्येपासून ‘थलाईवी’तील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे. तसंच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणे थांबवले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे, असा पलटवार कंगनाने केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter sent to election commission ncw seeks action against supriya shrinate for post on kangana ranaut scj