Levi’s Jeans : महिला ग्राहकाला सदोष जीन्स विकल्याप्रकरणी लिव्हाईस स्ट्रॉस इंडिया प्रा. लि. कंपनीला महिलेला ३२ हजार ७९९ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक लवादाने दिले आहेत. सृष्टी यादव नावाच्या महिलेने तिला विकण्यात आलेल्या जीन्स प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणी ग्राहक लवादात धाव घेतली होती. त्यानंतर हा निर्णय लवादाने दिला आहे.
काय आहे प्रकरण? कुठे घडली घटना?
उत्तराखंडच्या नैनीताल या ठिकाणच्या ग्राहक लवादाने सृष्टी यादव विरुद्ध लिव्हाईस जीन्स कंपनी यांच्यातील दावे-प्रतिदावे ऐकून घेतले. त्यानंतर कंपनीने ३२ हजारांची भरपाई द्यावी असे आदेश दिले. या महिलेने केलेल्या आरोपानुसार तिने लिव्हाईसच्या दोन जीन्स घेतल्या. त्या दोन्ही सदोष होत्या. कारण त्याचा रंग पहिल्या धुण्यातच उतरला. यानंतर सृष्टी यादव या महिलेने ग्राहक संरक्षण लवादाकडे आपली तक्रार नोंदवली होती.
तीन जणांच्या पीठाने काय निर्णय दिला?
लवादाचे अध्यक्ष रमेश कुमार जयस्वा आणि विजयालक्ष्मी थापा तसंच लक्ष्मण सिंह राव यांच्या पीठाने लिव्हाईस स्ट्रॉस इंडिया या कंपनीला तक्रारदार महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेला जीन्सचा रंग गेल्याने मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिला ३२ हजार रुपये नुकसान भरपाई द्या असे आदेश दिले आहेत. लिव्हाईससारख्या आंतराराष्ट्रीय ब्रांडने रंगासारखा मुद्द्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे असंही लवादाने म्हटलं आहे. तसंच महिला ग्राहकाला तातडीने नुकसान भरपाई द्या असे आदेश दिले आहेत.
तक्रारदार महिलेने जीन्स कधी घेतली होती?
तक्रारदार महिला सृष्टी यादवने हल्द्वानी या ठिकाणी असलेल्या लिव्हाईस स्टेअरमधून २०२२ मध्ये जीन्स विकत घेतली होती. या जीन्सची किंमत २ हजार २९९ रुपये होती. दीपिका पदुकोण कलेक्शन मधली ही जीन्स होती जी मी विकत घेतली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा मी जीन्स पहिल्यांदा वापरली तेव्हा त्या जीन्सचा रंग माझ्या पायांना आणि माझ्या बॅगला लागला. याबाबत मी लिव्हाईसकडे आणि संबंधित स्टोअरच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रारी केल्या. पण काही उपयोग झाला नाही. जो रंग माझ्या त्वचेला लागला त्यामुळे मला जळजळ झाली. त्याबद्दलही मी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला कळवलं होतं. अनेकदा तक्रारी करुन उपयोग न झाल्याने मी ग्राहक सुरक्षा लवादाचा दरवाजा ठोठावला.
लिव्हाईस कंपनीचा दावा काय?
ग्राहक लवादाकडे जेव्हा हे प्रकरण उभं राहिलं त्याआधी कंपनीने सृ्ष्टी यांना हे स्पष्टीकरण दिलं की सदर जीन्स आम्ही बंगळुरु या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी पाठवली. गुणवत्तेच्या सगळ्या कसोट्यांमध्ये ती जीन्स व्यवस्थित आहे असा अहवाल आम्हाला मिळाला. यामुळे सृष्टी यांनी ग्राहक लवादात धाव घेतली. २०२२ च्या म्हणजेच तीन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात निवाडा झाला असून लवादाने कंपनीला सदर ग्राहकाला ३२ हजार रुपयांची भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. barandbench ने वृत्त दिलं आहे.