PM Narendra Modi Podcast with Lex Fridman : अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंता आणि ‘पॉडकास्टर’ लेक्स फ्रिडमन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. जवळपास तीन तासांची ही मुलाखत होती. या मुलाखतीत पंतप्रधानांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली आणि अनुभवकथन केले. आपले बालपण, हिमालयातील अनुभव, आपल्या जडणघडणीत संघाचे स्थान, पाकिस्तान-ट्रम्प यांच्याबरोबरचे संबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी यात भाष्य केले. या खास मुलाखतीसाठी मुलाखतकार लेक्स फ्रिडमन यांनी जवळपास दोन दिवस उपवास धरला होता. या उपवासाविषयी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
या मुलाखतीसाठी दोन दिवस उपवास धरला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपवासाविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी या प्राचीन प्रथेविषयी आणि त्यामुळे लोकांचं जीवन कसं बदलतं याविषयी भाष्य केलं. उपवासाने स्वतंत्र विचार करण्यास मदत मिळते आणि त्यामुळे संवेदना वाढतात, असं मोदी म्हणाले. त्यावर अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन म्हणाले, “म्हणून मी हे देखील सांगायला हवे की मी सध्या उपवास करत आहे. या मुलाखतीसाठी जवळजवळ २ दिवस म्हणजेच ४५ तास मी उपवास धरला. या संभाषणाच्या सन्मानार्थ फक्त पाणी प्यायलो आहे, अन्न नाही. यामुळे अध्यात्मिक पातळवर मानसिक तयारी होईल.” लेक्स फ्रिडमन यांचं हे वक्तव्य ऐकताच पंतप्रधान मोदींना हसू अनावर झाले. माझ्या सन्मानार्थ तुम्ही उपवास धरलात? याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्याविषयीचा आदर व्यक्त करण्याकरता उपवास धरत आहात”, असं मोदी म्हणाले.
उपवास म्हणजे भारताची जीवनशैली
मोदी म्हणाले, उपवासामुळे तुमची इंद्रिये अति-तीक्ष्ण, अत्यंत जागरूक आणि पूर्णपणे सक्रिय होतात. निरीक्षण करण्याची आणि जाणण्याची तुमची क्षमता अधिक मजबूत होते. मी हे स्वतः अनुभवले आहे.” उपवासामागील आध्यात्मिक तत्वज्ञान उलगडताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या धार्मिक परंपरा प्रत्यक्षात एक जीवनशैली आहेत.”
“आपल्या धर्मग्रंथांमध्ये मन, आत्मा आणि शरीर, बुद्धी आणि मानवता यांच्या उन्नतीवर सखोल चर्चा झालेली आहे. ते हे साध्य करण्यासाठी विविध प्रणाली आणि परंपरांची रूपरेषा देतात. आणि उपवास हा त्यापैकी एक आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अधिक स्पष्टीकरण देताना, पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्माला केवळ “विधी किंवा उपासनेच्या पद्धतींबद्दल नाही तर जगण्याची एक पद्धत” म्हणून कसे पाहिले आहे ते सांगितले.
“सोप्या भाषेत सांगायचे तर, उपवास आतील आणि बाह्य दोन्ही गोष्टींना संतुलित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. उपवास जीवनाला खोलवर आकार देते”, असंही मोदी म्हणाले. तसंच, मोदींनी यावर भर दिला की “केवळ उपवास करणे हेच सर्वस्व नाही. भारतात, सांस्कृतिकदृष्ट्या किंवा तत्वज्ञानाने पाहिले तरी उपवास हा शिस्त जोपासण्याचा एक मार्ग आहे.”