अमेरिका व इतर काही देशांनी आमच्यावर केलेला देश पुरस्कृत सायबर हल्ल्याचा आरोप म्हणजे एखाद्याला आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत चीनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ली केकियांग यांनी त्यांच्या देशावर करण्यात आलेले हॅकिंगचे आरोप फेटाळून लावले.
आपल्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान ली यांनी सांगितले की, सायबर क्षेत्रात हॅकिंग स्वरूपातील हल्ले ही जागतिक समस्या आहे. आमचा देशही अशा हल्ल्यांचा शिकार बनलेला आहे. चीन अशा हल्ल्यांचे समर्थन करीत नाही उलट विरोधच करतो. एकमेकांवर निराधार आरोप करणे चुकीचे आहे. सायबर सुरक्षेसाठी काही व्यवहार्य गोष्टी करण्याकरिता जास्त वेळ दिला पाहिजे असेही ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या आठवडय़ात असे सांगितले होते की, अमेरिकी संस्था व पायाभूत सुविधा केंद्रांवर चीनकडून देशपुरस्कृत सायबर हल्ले करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी अमेरिकी काँग्रेसच्या अहवालातही सायबरविश्वात अमेरिकेला चीनचाच जास्त धोका असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अमेरिकेतील अलीकडच्या काही अहवालात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने शांघाय येथील कार्यालयातून अमेरिकेतील संस्थांवर सायबर हल्ले करून संगणकांचे हॅकिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपांना उत्तर देताना ली म्हणाले की, हा आरोप सिद्ध होण्याआधीच एखाद्याला दोषी धरण्याचा प्रकार आहे, दोन्ही देशांनी एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने हॅकिंगचे आरोप याआधीच फेटाळले असून या हॅकिंगचे आयपी पत्त्याच्या आधारे कुठलेही पुरावे नाहीत. उलट २०१२ या वर्षांत चिनी लष्कराच्या संकेतस्थळांवर १.४४ लाख वेळा परदेशी हॅकर्सनी हल्ले केले. त्यातील ६२.९ टक्के हल्ले हे अमेरिकेतून झालेले होते असा दावा पीपल्स लिबरेशन आर्मीने केला आहे. चीनचे नवनिर्वाचित अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना गेल्या आठवडय़ात फोन करून सायबर सुरक्षेची चर्चा केली होती. सायबर सुरक्षा हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा