पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मिळवण्यासाठी मोफत योजनांची ‘रेवडी संस्कृती’ अशी संभावना केल्यामुळे त्यावर उलटसुलट राजकीय टीका होत आहे. काँग्रेसने शुक्रवारी मोदींवर खोटय़ा आश्वासनांची संस्कृती रुजवल्याचा आरोप केला. या ‘खोटेपणाच्या संस्कृती’पासून देशाला कधी मुक्ती मिळेल, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी विचारला आहे.

 ते म्हणाले, की  शेतकऱ्यांकडून धान्यखरेदी करण्यास ‘रेवडी संस्कृती’ म्हटले जात आहे. मात्र, फसवणाऱ्या उद्योजकांचे गेल्या पाच वर्षांत नऊ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ करून बुडीत खात्यात टाकण्यात आले.  मोदी सरकारने सांगितले होते, की २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलरची होईल. ही यादी खूप दीर्घ आहे. या ‘खोटेपणाच्या संस्कृती’तून देशाची कधी मुक्तता होणार? पंतप्रधान मोदींनी येत्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपल्या या आश्वासनांच्या पूर्ततेची नवी मुदत तरी सांगावी, असे गौरव वल्लभ म्हणाले. 

Story img Loader