नवी दिल्ली : अदानी समूहापासून म्युच्युअल फंड दूर राहिले, मग, सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची कंपनी, ‘एलआयसी’ने धोकादायक गुंतवणूक का केली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. ‘हम अदानी के है कौन’ प्रश्नमालिकेत सोमवारी काँग्रेसने केंद्र सरकारला आणखी तीन प्रश्न विचारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी समूहामध्ये ‘एलआयसी’ने गुंतवणूक करण्यापूर्वी, खासगी गुंतवणूकदारांनी किती गुंतवणूक केली, त्यांचा या समूहामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भातील दृष्टिकोन काय, याची शहानिशा केंद्र सरकारने का केली नाही? ‘भांडवलदार मित्रां’ना लाभ मिळवून देण्याचा तर हा प्रकार नव्हे, असा प्रश्न उपस्थित करून ‘एलआयसी’च्या ३० कोटी विमाधारकांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  

अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांभोवती संशयाचे धुके गडद होत होते. त्याची ‘सेबी’कडून चौकशीही केली गेली होती. अदानी समूहातील संशयास्पद गुंतवणूकदारांसंदर्भात पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय अर्थमंत्रालय वा ‘एलआयसी’कडून एकदा तरी जाहीर शंका व्यक्त केली गेली का? या शंका फेटाळल्या गेल्या का आणि कोणी फेटाळल्या, असाही मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला.

‘नुकसानीची माहिती लोकांना देणार काय?’

अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरले असून ‘एलआयसी’चे किती नुकसान झाले, याची माहिती लोकांना देणार का?  ‘एलआयसी’ने अदानी समूहामध्ये केलेल्या दिशाहिन गुंतवणुकीमुळे समभागधारकांच्या ‘एलआयसी’वरील विश्वासाला धक्का लागण्याची शक्यता असून त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे, असाही प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic risky investment three questions congress series hum adani ke hai kaun ysh