पुढील वर्षी देशात सर्वाधिक खासदार निवडून जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेशमधलं राजकीय वातावरण आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आघाडीवर असून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ते विरोधकांवर निशाणा साधत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात अशाच एका कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ येत असताना त्यांच्या येण्याच्या काही वेळ आधीच एक इसम रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहात शिरला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात चक्क ४ पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

नेमकं झालं काय?

बस्ती जिल्ह्यातील अटल बिहारी वाजपेयी ऑडिटोरियममध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ स्वत: उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचं आगमन होण्याच्या अवघ्या ४० ते ४५ मिनिटे आधी, सभागृहात एकच खळबळ उडाली. सभागृहात एक व्यक्ती रिवॉल्व्हर घेऊन शिरल्याचं वृत्त सगळीकडे पसरलं.

या व्यक्तीचं नाव जितेंद्र पांडे असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जतशंकर शुक्ला आणि त्याचा नातेवाईक जितेंद्र पांडे आणि त्याचा भाऊ अमरदीप हे तिघे कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. मात्र, जितेंद्र पांडेनं सभागृहात येताना सोबत रिवॉल्व्हर आणलं होतं. रिवॉल्व्हरचा परवाना देखील त्याच्यानावे होता. मात्र, पोलिसांना समजताच जितेंद्र पांडेला तातडीने सभागृहाबाहेर काढण्यात आलं.

४ पोलीस निलंबित, तिघांवर कारवाई होणार

खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमाच्या अवघ्या ४५ मिनिटे आधी सभागृहात रिवॉल्व्हर घेऊन एखादी व्यक्ती प्रवेश करत असल्यामुळे पोलीस यंत्रणेचं हे मोठं अपयश मानलं गेलं. त्यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने तातडीने संबंधित चार पोलिसांना निलंबित केलं आहे. याशिवाय, या प्रकारामध्ये अजून तीन पोलीस कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही व्यक्ती नेमकी कोणत्या उद्देशाने सभागृहात आली होती आणि त्याने सोबत रिवॉल्व्हर का आणलं होतं, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नसून त्यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader