वृत्तसंस्था, नवी दिल्ली : समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. ‘अमेरिकन बार असोसिएशन’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रवास आणि तंत्रज्ञानामुळे मानवतेचा विस्तार झाला, परंतु आपण व्यक्ती म्हणून ज्यावर विश्वास ठेवतो तेही आपण स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे मानवतेची पीछेहाटही झाली आहे. हेच खरे तर आपल्या युगाचे आव्हान आहे. कदाचित हे तंत्रज्ञानाचे ‘उत्पादन’ असावे, असेही सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले.
जेव्हा राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हा इंटरनेट, समाजमाध्यमे नव्हती. आपण ‘अल्गोरिदम’द्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या जगात राहत नव्हतो. आता समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे, बीज म्हणून जे काही सांगितले जाते त्याचाच सिद्धांत होतो, ज्याची तर्कशुद्ध विज्ञानाच्या कसोटीवर चाचणी केली जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.
जल्पकांची न्यायाधीशांवरही टीका
समाजमाध्यमांवरील टीका-टिपण्यांवर भाष्य करताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘‘समाजमाध्यमांत जल्पकांकडून (ट्रोल) केल्या जाणाऱ्या टीकेपासून न्यायाधीशही सुटलेले नाहीत. प्रत्येक छोटय़ा कृतीसाठी आम्हाला (न्यायमूर्ती) आणि तुम्हालाही तुमचा दृष्टिकोन समजून न घेता कुणाच्या तरी टीकेला तोंड द्यावे लागते.’’