लेफ्टनंट जनरल लॉरा जे रिचर्डसन या अमेरिकन सैन्याची सर्वांत मोठ्या कमांडची धुरा सांभाळणार आहेत. एका महिला अधिकाऱ्याला इतकी मोठी जबाबदारी देण्याची अमेरिकेच्या सैन्यदलाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. लॉरा या यूएस आर्मी फोर्सेज कमांडचे (फोर्सकॉम) नेतृत्व करतील. या कमांडमध्ये ७७६००० सैनिक आणि ९६००० सैनिकेतर कर्मचारी आहेत.
सैन्य अधिकारी म्हणून लॉरा यांनी आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १९८६ मध्ये त्या अमेरिकेच्या सैन्यदलात सहभागी झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये फर्स्ट कॅवलरी डिव्हिजनचे डेप्यूटी कमांडिग जनरल पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. कॅवलरी डिव्हिजन ‘अमेरिका फर्स्ट टीम’ या नावानेही ओळखली जाते. वर्ष २०१७ मध्ये लॉरा जनरल रॉबर्ट बी अब्राम्स यांच्या कमांडमध्ये दुसऱ्या स्थानावर होत्या. त्यावेळी त्या उत्तर कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅग येथील फॉरस्कॉममध्येही डेप्यूटी जनरलपदी होत्या.