बाह्य़ग्रह हे जीवसृष्टीस अनुकूल असून तेथे पाणी व वसाहतीस योग्य स्थिती असण्याची शक्यता आपल्या अंदाजापेक्षा जास्त आहे, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
कॅनेडियन इन्स्टिटय़ूट फॉर थिओरॉटिकल अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या टोरांटो विद्यापीठाच्या संस्थेतील संशोधक जेरेमी लेकाँटे यांच्या मते या बाह्यग्रहांवर महासागर व पृथ्वीसारखे वातावरण असण्याची शक्यता आपण मानतो त्यापेक्षा अधिक आहे.
वैज्ञानिकांना असे नेहमीच वाटत आले आहे की, बाह्य़ग्रह पृथ्वीप्रमाणे नसावेत व त्यांची एकच बाजू ताऱ्याकडे येत असावी. पण जर तसे असते, तर बाह्य़ग्रह एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्या ताऱ्याभोवती फिरले असते व त्यांचा एक अर्धगोलार्ध ताऱ्यासमोर व दुसरा अंधारात राहिला असता. लेकाँटे यांच्या मते बाह्य़ग्रह त्यांच्या ताऱ्यांभोवती फिरताना दिवस व रात्र हे चक्र पृथ्वीसारखेच दाखवतात.
जर आम्ही बरोबर असू तर कुठलीही बाह्य़ ग्रहांची एक बाजू ताऱ्याभोवती असणे शक्य नाही; अन्यथा पाणी बर्फाच्या लादीखाली राहिले असते. बाह्य़ग्रहांच्या संदर्भात हे नवीन ज्ञान तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढवणारे आहे. लेकाँटे व त्यांच्या पथकाने म्हटले आहे की, त्रिमिती हवामान प्रारूपाने आम्ही त्या ग्रहांचा फिरण्याचा वेग, हवामान याबाबत काही अंदाज मांडले आहेत. वातावरण हा ग्रहांच्या फिरण्यात महत्त्वाचा घटक असतो व परिभ्रमणाची स्थिती त्यावर अवलंबून असल्याने दिवस-रात्र हे चक्र असू शकते.
काही खगोलवैज्ञानिकांच्या मते हा निरीक्षणात्मक पुरावा आवश्यक आहे; केवळ सैद्धांतिक युक्तिवाद काही कामाचे नाहीत. पृथ्वीच्या बाबतीत वातावरण विरळ आहे. सूर्याचा बराच प्रकाश खाली येतो व त्यामुळे एक वेगळे हवामान तयार होते. पृथ्वीवर दिवसा व रात्री विषुववृत्तावर व ध्रुवावर वेगवेगळी तापमाने असतात.
त्यामुळे वारे थंड किंवा गरम होण्याने वातावरणाचे वस्तुमान बदलते. त्यामुळे ग्रहाभोवती फिरणाऱ्या उपग्रहामुळे भरतीच्या घर्षणाने निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे संरक्षण होते. काही वैज्ञानिकांच्या मते बाह्य़ग्रह हे त्यांच्या ताऱ्यांभोवती विशिष्ट पद्धतीने फिरत नाहीत. ‘सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा