नवी दिल्ली : जगभरात २०१९ ते २०२१ या दरम्यान आलेल्या ‘कोविड-१९’ महासाथीमुळे जागतिक आयुर्मान १.६ वर्षांनी घटले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये काढण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या प्रगतीने उलटा प्रवास केल्याचे दिसून येत आहे.‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांच्या समन्वयाने हे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ (जीबीडी) २०२१च्या अद्ययावत अंदाजांचाही समावेश करण्यात आला.

हेही वाचा >>> पोखरण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचा साक्षीदार! ‘भारत शक्ती’ सरावादरम्यान पंतप्रधान मोदींचे गौरवौद्गार

या संशोधनातून ‘कोविड-१९’ महासाथीच्या पहिल्या दोन वर्षांच्या संदर्भात लोकसंख्याशास्त्रीय कलाचे पूर्ण मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यामधून जगभरात आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाज यांच्यावरील परिणाम शोधण्याचा प्रयत्न केल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. त्यामध्ये जागतिक लोकसंख्येचे वय वाढण्यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनाचाही समावेश आहे.

‘कोविड-१९’ महासाथीच्या कालावधीत ८४ टक्के देश आणि भूप्रदेशातील आयुर्मान घटले असे या संशोधनामध्ये आढळले आहे. यावरून करोना विषाणूचे विध्वंसक परिणाम दिसून येतात असे संशोधकांनी नमूद केले आहे. मेक्सिको शहर, पेरू आणि बोलिव्हिया यासारख्या शहरे आणि देशांत सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळते. जगभरात यापूर्वी प्रौढांच्या मृत्युदरात घट होण्याच्या कलाने उलटा प्रवास करून २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये प्रौढांच्या मृत्युदरात वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बाल मृत्युदरामध्ये होत असलेली घट ही ‘कोविड-१९’ महासाथीदरम्यानही सुरू राहिली. मात्र आधीच्या काही वर्षांपेक्षा त्याचा वेग मंदावला होता. पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण २०१९च्या तुलनेत २०२१मध्ये साधारण पाच लाखांनी कमी झाले.

Story img Loader