पीटीआय, नवी दिल्ली
दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीची पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, पाचव्या दोषीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी शिक्षा सुनावताना सांगितले की, हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ (‘रेअरेस्ट ऑफ रेअर’) प्रकारात मोडत नाही. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.
रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक आणि अजयकुमार यांना जन्मठेप आणि पाचवा दोषी अजय सेठीला तीन वर्षांच्या सामान्य कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने कपूर, शुक्ला, मलिक आणि कुमार यांना प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपयांचा आणि सेठीला सात लाख २५ हजारांचा रुपयांचा दंड ठोठावला आहे.