पीटीआय, इम्फाळ
मणिपूरमधील २७ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय समितीच्या आवाहनावरून पाळण्यात आलेल्या २४ तासांच्या बंदमुळे इम्फाळ खोऱ्यातील सामान्य जनजीवन शनिवारी विस्कळीत झाले. बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिली.सार्वजनिक वाहतूक बंद होती आणि केवळ काही मोजकी खासगी वाहने रस्त्यांवर धावताना दिसून आली. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या बंदमुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या.
पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मणिपूरशी संबंधित विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी या बंदचे आवाहन करण्यात आले होते. हा संप लोकांच्या अडचणींमध्ये भर घालण्यासाठी नाही, तर ‘सरकारवर दबाव आणण्यासाठी’ होत असल्याचे समितीचे समन्वयक एल. विनोद यांनी पूर्वी सांगितले होते.दरम्यान, मणिपूर विधानसभेचे अधिवेशन २१ ऑगस्टपासून बोलवावे, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी राज्यपाल अनसूया उईके यांना केली.