विश्व हिंदू परिषदेचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती आणि अन्य चार जणांच्या २००८ मधील हत्येवरून एका माओवादी नेत्यासह आठ जणांना कंधमाल जिल्हा न्यायालयाने सश्रम तुरुंगवासाची जन्मठेप ठोठावली. लक्ष्मणानंद यांच्या हत्येनंतर उसळलेल्या जातीय दंगलीत ३८ जण मृत्युमुखी पडले होते.
धार्मिकदृष्टय़ा अत्यंत संवेदनाक्षम असलेल्या कंधमाल जिल्ह्य़ातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र कुमार तोष यांनी हा निकाल जाहीर केला तेव्हा न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आठहीजणांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरता आल्यास या दोषींना दीड वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने हे सातजण दोषी असल्याचा निकाल ३० सप्टेंबरला तर पुलारी रामा राव ऊर्फ उदय हा आंध्र प्रदेशातील कडवा माओवादी नेता दोषी असल्याचा निकाल १ ऑक्टोबरला जाहीर केला होता. शिक्षेची व्याप्ती गुरुवारी जाहीर करण्यात आली. पुलारी रामा राव याने आपल्या साथीदारांसह २३ ऑगस्ट २००८ रोजी लक्ष्मणानंद आणि त्यांच्या चार शिष्यांची कंधमालमधील आश्रमात निर्घृण हत्या केली होती. या शिष्यांमध्ये माता भक्तीमयी, कृतानंद बाबा, किशोर बाबा आणि पुरंजन गुंथा यांचा समावेश होता. दोषींमध्ये पुलारी रामा राव याच्यासह गदानाथ छलनसेठ, बिजय कुमार श्यामसेठ, बुध्द नायक, सनातन बडमाझी, दुर्योधन सुनामाझी, भास्कर सुनामाझी आणि मुंडा बडमाझी यांचा समावेश आहे. सोमनाथ दंडसेन याला पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले आहे. ३२ साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे हा निर्णय देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा