काँग्रेस खासदार राहुल गांधी हे गेल्या दोन महिन्यांपासून भारत जोडो यात्रेदरम्यान देशात फिरत आहेत. कन्याकुमारीपासून त्यांची ही यात्रा सुरू झाली होती. या यात्रेदरम्यान सर्वच क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे यात्रा स्थगित करण्याची मागणी भाजपाकडून केली जात असताना आता राहुल गांधींच्या जीवितालाच धोका निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा हवाला देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसनं केंद्र सरकारला पत्रदेखील पाठवलं आहे.
राहुल गांधींच्या जिवाला धोका?
राहुल गांधींच्या जिवाला धोका असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. यासाठी केंद्रीय यंत्रणेच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्राला लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही ९ शी बोलताना यामागची काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘ईडी’ची व्याप्ती वाढली, विश्वासार्हतेचे काय?
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोलेंनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे आमचं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. “केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून अहवाल समोर आला आहे की राहुल गांधींच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत पत्र पाठवलं आहे. आता आमचं लक्ष नरेंद्र मोदींकडे आहे की ते काय निर्णय घेतात. राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांना भेटणारच. कारण सामान्य लोक राहुल गांधींना त्यांच्या यात्रेदरम्यान भेटतच आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही ही सुरक्षा मागितली आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“बोम्मई रोज आग ओकत आहेत”
दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य सरकारच्या धोरणावर टीकास्र सोडलं. “बोम्मई फक्त सीमेवर नाही, मुंबईपर्यंत आले आहेत. महाराष्ट्र तोडण्याचं कट कारस्थान भाजपा करत आहे हे लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे हस्तक आहेत हे त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या इशाऱ्यावर राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काम करत आहेत. बोम्मई रोज आग ओकत आहेत. असं असताना राज्यातलं सरकार गळचेपी करत आहे. त्यांचा खरा चेहरा जनतेला कळलेला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.