गेल्या कित्येक वर्षांपासून माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर वार्तांकन आणि अनेकविध विषयांना वाचा फोडण्याचं काम केलं जात आहे. आता त्यामध्ये प्रसारमाध्यमांनीही मोठा हातभार लावायला सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही असे काही विषय किंवा अशी काही क्षेत्रं आहेत, जिथपर्यंत माध्यमं पोहोचू शकलेली नाहीत. हे विषय कदाचित तुमच्या आसपासचे असतील किंवा अगदी राज्य किंवा देश पातळीवरचेही असू शकतील. असे विषय जगासमोर यावेत आणि त्यावर अभ्यासपूर्ण वार्तांकन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठीच Lighthouse Journalism हा उपक्रम आहे.
तुमच्याकडेही असे विषय आहेत?
लाईटहाऊस जर्नलिजमचा उद्देशच मुळात माध्यमांच्या मुख्य प्रवाहात हरवलेल्या विषयांना हात घालणं हा आहे. मग तो विषय म्हणजे समाजात बदल घडवून आणण्यासाठी झटणारी एखादी व्यक्ती असेल, एखादा गट असेल किंवा एखादी संघटना असेल.
लाईटहाऊस जर्नलिजमच्या वेगळेपणाबाबत बोलताना इंडियन एक्स्प्रेसचे सीईओ संजय सिधवानी सांगतात, “समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्यांकडे बघण्याच्या किंवा त्यांचं यश जगापर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीमध्येच लाईटहाऊस जर्नलिजममुळे अमूलाग्र बदल घडणार आहे. आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या समस्या आणि कल्पना यामुळे प्रकाशझोतात येणार आहेत. यासाठी क्राऊड फंडिंगसारखं एक अनोखं मॉडेल मोठा हातभार लावणार आहे.”
गुगलनंही घेतली उपक्रमाची दखल!
लाईटहाऊस जर्नलिजम या उपक्रमाची खुद्द गुगलनं देखील दखल घेतली आहे. या उपक्रमाला गुगलकडून ऑनलाईन पत्रकारितेमध्ये वार्तांकनाच्या नव्या पद्धती शोधून काढण्यासाठी दिला जाणारा Google News Initiative Innovation Challenges Award हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
काय आहे क्राऊड फंडिंग मॉडेल?
लाईटहाऊस जर्नलिजम उपक्रमामध्ये तुम्हाला स्वत: विषय किंवा बातमी निवडण्याचा पर्याय असेल. तुम्हाला आवश्यक वाटत असलेला एखादा विषय किंवा बातमी तुम्ही सुचवायची. त्यासाठी टोकन म्हणून एक रक्कम अदा करायची. तुमच्या विषयासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना आवाहन करून देखील तुम्ही क्राऊड फंडिंग उभं करू शकता. अशा प्रकारे सुचवण्यात आलेल्या विषयांपैकी कोणत्या विषयांची निवड करायची, एखाद्या विषयासाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून किती निधी जमा होऊ द्यायचा आणि संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण वृत्तांकन करण्यासाठी किती निधी एखाद्या फ्रीलान्स जर्नलिस्टला उपलब्ध करून द्यायचा, याविषयी संपादकीय मंडळ निर्णय घेईल.
तुम्हाला काय करावं लागेल?
चला तर मग, या अनोख्या व्यासपीठावर आपला विषय मांडण्यासाठी तुम्ही www.lighthousejournalism.com या वेबसाईटवर नोंदणी करा. तुम्हाला महत्त्वाचा वाटत असलेला विषय तिथे नोंदवा आणि व्यावसायिक पत्रकारांकडून त्यावर अभ्यासपूर्ण वार्तांकन करून घ्या!