वॉशिंग्टन : रशियाप्रमाणेच चीननेही २०१६ च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच केला आहे.
गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना ट्रम्प यांनी न्यूयॉर्क येथे असा आरोप केला होता की, अमेरिकेत २०१८ मध्ये होणाऱ्या मध्य मुदतीच्या निवडणुकातही त्यांचा हस्तक्षेपाचा डाव आहे. चीनने मात्र हे आरोप फेटाळले होते.
ट्रम्प यांनी रविवारी सीबीएस न्यूजच्या ६० मिनिट्स या कार्यक्रमात प्रथमच चीनवर २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला असून ते म्हणाले की, रशियाने अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केला पण चीननेही तो केला आहे. चीन ही मोठी डोकेदुखी झाली आहे त्यांनीही येथील निवडणुकीत हस्तक्षेप केला. रशियाच्या हस्तक्षेपावरील लक्ष उडवण्यासाठी चीनवर आरोप केल्याचा त्यांनी इन्कार केला. ‘रशियाने हस्तक्षेप केलाच पण मी तर म्हणतो चीननेही तो केला’, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणातील चौकशीवरून अध्यक्ष ट्रम्प व महाधिवक्ता जेफ सेशन्स यांच्यात मतभेद झाले होते, सेशन्स यांनी या चौकशीतून माघार घेतल्याबाबत ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणातील चौकशी बंद पाडण्याचा हेतू नसल्याचे सांगून ते म्हणाले की, मी शपथेवर काही सांगत नसतो पण चौकशी बंद करण्याचा कुठलाही हेतू नाही, ही चौकशी अन्याय्य आहे कारण असे रशियाशी कुठलेच साटेलोटे नव्हते. सध्या रॉबर्ट म्युलर हे या प्रकरणाची चौकशी करीत असून ३२ जण दोषी ठरले आहेत किंवा त्यांनी कबुली दिली आहे. निवडणुकीत मदतीसाठी रशियाला आवाहन केले हा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले की, मी मदतीसाठी रशियाकडे याचना केली असे तुम्हाला तरी खरोखर वाटते का, रशियानेसुद्धा हे आरोप हास्यास्पद ठरवले आहेत.
खाशोगी प्रकरणी सौदी राजाची मध्यस्थी
दुबई : जमाल खाशोगी या बेपत्ता पत्रकाराच्या प्रकरणात सौदी अरेबियाोणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी सौदी राजे सलमान यांनी मध्यस्थी चालवली आहे. सौदी अरेबियाचा नागरिक असलेला जमाल काशोगी हा पत्रकार अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी लिखाण करत होता. २ ऑक्टोबर रोजी तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील सौदी दुतावासात जाताना त्याला अकेरचे पाहण्यात आले. तेव्हापासून त्याचा काही ठावठिकाणा लागत नाही. खाशोगी हा सौदीचे नवे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या धोरणांविरुद्ध लिखाण करत होता. त्यामुळे दुतावासात त्याचे हाल करून त्याला ठार मारण्यात आले, असे अनेकांचे म्हणणे आहे. खासोगीच्या मृत्यूत जर सौदी राजघराण्याचा हात असल्याचे दिसून आले तर सौदी अरेबियावर निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. त्यावर सौदीने प्रतिकार करण्याचा इशारा दिला. या प्रकरणावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी सोमवारी राजे सलमान यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासी दूरध्वनीवरून चर्चा केली. ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांना तातडीने सौदी अरेबियाला पाठवत असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. तत्पूर्वी राजे सलमान यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्याशीही चर्चा केली.