जागतिक वारसास्थळांपैकी एक असणारा आग्रा येथील ताजमहालात आता पर्यटकांवर काही बंधने येण्याची शक्यता आहे. याठिकाणी होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहता गर्दी व्यवस्थापनाच्यादृष्टीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेकडून (एएसआय) ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वेळेची मर्यादा घालून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना फक्त तीन ते चार तासांपुरताच ताजमहालात थांबता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून ताजमहालमध्ये गर्दीचे व्यवस्थापन कशाप्रकारे करता येईल, याचा तपशील मागविण्यात आला होता. त्याला उत्तर देताना एएसआय समितीतर्फे सोमवारी सुप्रीम कोर्टात यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी खंडपीठाने तुम्ही भविष्यात ताजमहालमधील गर्दीचे व्यवस्थापन कशाप्रकारे करणार आहात, असा प्रश्न एएसआय समितीच्या ए.डी.एन. राव यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राव यांनी याबद्दलचा प्रस्ताव अगोदरपासूनच तयार असल्याचे सांगितले. ताजमहालाच्या वास्तूत एकाचवेळी खूप लोकांची गर्दी असते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या ताजमहालात थांबण्याच्या वेळेवर मर्यादा घालण्याचा आमचा विचार आहे. अनेक पर्यटक सकाळी ७ वाजता तिकीट घेऊन ताजमहालात जातात आणि वेळ संपेपर्यंत तेथेच थांबून राहतात. त्यामुळे आम्ही भविष्यात वेगवेगळ्या रंगाची तिकीटे देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसातील विशिष्ट आणि वेगवेगळ्या कालावधी दर्शविण्यासाठी तिकिटांना वेगवेगळा रंग देण्यात येईल. विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रंगाचे तिकीट असेल. पर्यटकांना याठिकाणी जास्तीत जास्त तीन ते चार तासच थांबून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या विविध रंगांच्या तिकिटांमुळे पर्यटकांची वेळेनुसार विभागणी करणे शक्य होईल. या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू असून त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राव यांनी दिली. दरम्यान, यावेळी एएसआयने पर्यटकांना ताजमहालाचा परिसर पाहण्यासाठी एकुण वेळेची ४५ मिनिटांच्या पाच सत्रांमध्ये विभागणी करण्यासंदर्भात परवानगी मागितली. सध्या पर्यटकांना ३० मिनिटांच्या आठ सत्रांमध्ये ताजमहाल पाहता येतो. हा कालावधी पुरेसा नसल्याची पर्यटकांची तक्रार असल्याचे राव यांनी कोर्टाला सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limit taj mahal visits to 3 4 hours says asi