मियामी :अर्जेटिनाचा तारांकित आघाडीपटू आणि फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी क्लबशी दोन वर्षांचा करार केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा इंटर मियामीने शनिवारी केली.
प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार सात वेळा जिंकणाऱ्या मेसीचा फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसोबतचा करार २०२२-२३ हंगामाच्या अखेरीस संपुष्टात आला. त्यानंतर त्याने अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘माझ्या कारकीर्दीतील पुढील टप्पा इंटर मियामी संघासोबत आणि अमेरिकेत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,’’ असे मेसी म्हणाला.
मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिना संघाने गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. मेसीला करारबद्ध करणे हे आमचे स्वप्न होते आणि आता ते सत्यात उतरले आहे, अशी भावना इंटर मियामीचा सह-संघमालक आणि माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने व्यक्त केली.
लीग्स करंडक फुटबॉल स्पर्धेतील २१ जुलैला होणाऱ्या क्रूझ अझुलविरुद्धच्या सामन्यात मेसी इंटर मियामीकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. इंटर मियामीला विजयपथावर आणण्याची जबाबदारी मेसीवर असेल. मियामीने गेल्या ११ पैकी एकाही सामन्यात विजय नोंदवलेला नाही. शनिवारी मेजर लीग सॉकरमध्ये मियामीला सेंट लुईस सिटी संघाकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला.