जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीला पॅलेस्टाइन फुटबॉल असोशिएशनने धमकी दिली आहे. सध्या संपूर्ण जगाला रशियामध्ये सुरु होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेआधी अर्जेंटिना आणि इस्त्रायलमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. या सामन्याला पॅलेस्टाइन फुटबॉल असोशिएशनचा विरोध आहे. मेसीने या सामन्यात खेळू नये यासाठी पॅलेस्टाइन फुटबॉल असोशिएशनने त्याला इशारा दिला आहे.
शनिवारी अर्जेंटिना-इस्त्रायलमध्ये होणाऱ्या या सामन्यामध्ये मेसी खेळला तर अरब आणि मुस्लिम फुटबॉलप्रेमींनी मेसीचे फोटो, टी-शर्ट जाळून टाकावेत असे आवाहन पॅलेस्टाइन फुटबॉल असोशिएशनच्या प्रमुखांनी केले आहे. रामल्ला येथील अर्जेंटिनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. पॅलेस्टाइनने हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे.
जेरुसलेम येथील फुटबॉल स्टेडियमवर शनिवारी हा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. मेसी हा सामना खेळू नकोस. या सामन्यातून तुला काहीही मिळणार नाही. उलट तू जगभरातील तुझे चाहते गमावशील. तू इथे आलास तर आम्ही तुझ्या विरोधात जाऊ. या राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ नकोस असे जिब्रिल राजोयुब यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दरम्यान गतउपविजेत्या अर्जेंटिनाला या वर्ल्डकपमध्ये तुलनेने सोपा गट मिळाला आहे. ड गटात त्यांच्यासमोर क्रोएशिया, नायजेरिया आणि पदार्पणाची स्पर्धा खेळणाऱ्या आइसलँडचे आव्हान असणार आहे. अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेसीला विजयी भेट देण्याच्या दिशेने उचललेले गट साखळी हे अर्जेटिनाचे पहिले पाऊल असणार आहे. गटात खडतर आव्हान नसले तरी येथील कामगिरी त्यांना पुढील वाटचालीचा आलेख उंचावण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या गटात दुसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि नायजेरिया यांच्यात कडवी चुरस अनुभवायला मिळणार आहे.
सेर्गियो रामेरो, एंजल डी मारिया, सेर्गियो अॅग्युरो, गोंझालो हिग्वेन, लुकास बिग्लीया आणि एव्हर बेनेगा या वरिष्ठ खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक आहे. त्याशिवाय लिओनेल मेसीला जेतेपद पटकावून त्याच्या मागे लागलेला उपविजेतेपदाचा शाप हटवायचा आहे. त्यामुळे अर्जेटिनाचा संपूर्ण संघ मोठय़ा ताकदीने मैदानात उतरणार आहे. गतवर्षी आणि १९९०च्या उपविजेतेपदाच्या जखमा त्यांना अजूनही वेदना देत आहेत आणि १९८६नंतर पुन्हा जेतेपद पटकावून त्या जखमा भरून काढण्याचा त्यांचा निर्धार आहे.