गुजरातमधील पाटण शहरातून एक हृदद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जबर मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रुग्णाच्या प्रायव्हेट पार्टला आग लवली. यात रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर व्यसनमुक्ती केंद्राच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की, आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
पोलिसांनी याप्रकरणी व्यसनमुक्ती केंद्राच्या व्यवस्थापकांसह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सहा आरोपीना अटकदेखील केली आहे. पोलीस आरोपींकडे सध्या चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आरोपींनी रुग्णाला तब्बल दीड तास मारहाण केली होती.
घटना काय?
मारहाण केल्यानंतर रुग्ण जेव्हा अर्धमेल्या अवस्थेत होता, तेव्हा आरोपींनी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून आग लावली. त्यात रुग्ण हार्दिक सुधार याचा मृत्यू झाला. त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्राच्या व्यवस्थापकांनी रुग्णाच्या कुटुंबियांना बोलावलं आणि सांगितलं की, उपचारांदरम्यान आजारपणामुळेच हार्दिकचा मृत्यू झाला. रुग्णाच्या कुटुंबियांनी व्यवस्थापकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंत्यविधी पूर्ण केले. परंतु पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. ज्यामुळे या हत्येची माहिती मिळाली.
हे ही वाचा >> “गर्भवती सुनेला १५ तास बसवून ठेवलं”, ईडीच्या धाडीवर लालू यादव संतापले, म्हणाले, “नतमस्तक…”
सहा आरोपी अटकेत
पोलीस निरीक्षक मेहुल पटेल यांनी सांगितलं की, व्यसनमुक्ती केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर व्यवस्थापक संदीप पटेल आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत याप्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सातवा आरोपी फरार असून त्याचा तपास केला जात आहे.