Chhapra hooch tragedy: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर छपरा येथील हूच (देशी दारुचा प्रकार) दुर्घटनेनंतर टीका केली आहे. हूच नावाने ओखळली जाणारी विषारी दारु प्यायल्याने राज्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीराज सिंह यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“दारु ही बिहारमध्ये देवाप्रमाणे झाली आहे. ती राज्यामध्ये सगळीकडे आहे, मात्र कोणाला ती दिसत नाही,” असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. आज बिहारच्या विधानसभेमध्ये याच विषारी दारुच्या सेवनाने झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे संतापल्याचं पहायला मिळालं. नितीश कुमार यांच्या संतापसंदर्भात बोलताना गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या वयाचा आणि लोकप्रियता घटत असल्याचा दाखला दिला.
छपरामधील विषारी मद्यसेवन प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या १७ जणांच्या मृत्यूबद्दल बोलताना आत नितीश कुमार संतापल्याचं दिसून आलं. याचसंदर्भात गिरीराज यांनी, “नितीशजी १० वर्षांपूर्वी असं करत नव्हते. कमी होणारी लोकप्रियता आणि वाढतं वय यामुळे ते अधिक तापट स्वभावाचे झाले आहेत,” असा टोला लगावला.
आज विधानसभेमध्ये बोलताना नितीश कुमार यांनी चढ्या आवाजात भाजपा आमदारांनी छपरामधील विषारी दारु प्रकरणातील मुद्द्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं. “काय झालं, विषारी दारु, तुम्ही लोक गोंधळ घालत आहात,” असं नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार हे सभागृहामध्येच भाजपाच्या आमदारांना हातानेच खाली बसण्याचा इशारा करत होते.
नितीश कुमार यांच्या विधानानंतर भाजपाने आक्षेप घेत नितीश यांनी माफी मागावी असं म्हटलं. मात्र नितीश यांनी माफी मागितली नाही आणि गदारोळामध्ये काही काळ कामकाज ठप्प झालं. बिहारमध्ये दारुबंदीचा नियम लागू आहे. त्यामुळेच लपून-छपून विषारी दारु पिणाऱ्या लोकांना अनेकदा जीवाला मुकावे लागते.